राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणात मोठी बातमी, महायुतीने 7 नावांचा प्रस्ताव पाठवला

| Updated on: Oct 14, 2024 | 9:11 PM

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या जागा अखेर नियुक्त करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणात मोठी बातमी, महायुतीने 7 नावांचा प्रस्ताव पाठवला
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार
Image Credit source: ANI
Follow us on

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आता राज्य सरकारनेदेखील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 12 पैकी 7 जणांची नावे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून 3, शिवसेनेकडून 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 अशा एकूण 7 जणांच्या नावांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठवण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरण, प्रचार करणारे तगडे पदाधिकारी या सगळ्यांचा विचार या नियुक्तीसाठी केला जाऊ शकतो. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर कुणाचं सरकार येईल हे आता सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची वर्णी लागावी यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न हा गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. या मविआ सरकारकडून 2020 मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 12 जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. पण भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारच्या शिफारसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. याच मुद्द्यावरुन राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्रव्यवहार झाल्याची देखील माहिती आहे. पण तरीदेखील भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या शिफारसीकडे लक्ष दिलं नाही.

राज्य सरकारच्या शिफारसीकडे दुर्लक्ष केल्याने आणि 12 जागा रिक्त असल्याने मविआ नेत्यांनी हे प्रकरण कोर्टात नेलं. कोर्टात बरेच दिवस या प्रकरणावर सुनावणी पार पडली. दरम्यान, राज्यात सत्तांतर घडून आलं. सत्तांतर घडून आल्यानंतर महायुतीकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी पावलं उचलण्यात आली. सुरुवातीला भाजपला 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना प्रत्येकी 3 जागा देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. तर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली वाढवल्याची बातमी समोर आली होती. यानंतर आता महायुतीसरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी भाजपकडून 3, शिवसेनेकडून 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 अशा एकूण 7 जणांच्या नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.