राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या जोरदार हालचाली?; महायुतीच्या नेत्यांच्या विधानांचा अर्थ काय?

| Updated on: Dec 29, 2023 | 6:47 PM

महाराष्ट्राचं राजकारण राज ठाकरे यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. राज ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात राज ठाकरे ज्यांच्याबाजूने असतील त्यांचा मोठा फायदा असणार आहे, त्यामुळे महायुतीचे नेते राज ठाकरे यांना आपल्यासोबत घेण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या जोरदार हालचाली?; महायुतीच्या नेत्यांच्या विधानांचा अर्थ काय?
Follow us on

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपप्रणित सत्ताधारी एनडीए आघाडीला कोणत्याही अवस्थेत देशात पुन्हा सरकार आणायचं आहे. तर विरोधी पक्षांच्या स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला ‘करो या मरो’ या धर्तीवर मोदी सरकारचा पराभव करायचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार हालाचाली घडताना दिसत आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा पक्ष आणि मराठी माणासाच्या प्रश्नांसाठी लढणारा प्रभावी नेता म्हणून ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणाच्या बाजूने असणार? हा मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या नेत्यांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कसं सेलिब्रेशन करावं, याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. असं असताना आता सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे यांना आपल्यासोबत यावेत यासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर देणारी वक्तव्ये सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या जोरदारी हालचाली तर सुरु नाहीत ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

शिंदे गटाचे नेते राज ठाकरेंच्या स्वागताला तयार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. या नेत्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. मंत्री शंभूराज देसाई यांनी तर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. “राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर उत्तमच आहे. ते आमच्यासोबत आले तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहू. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत”, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत. शिंदे गटाचेच नेते संजय शिरसाट यांनीदेखील याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे हे वेगवेगळ्या सूचना देत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या भेटीवर दिली आहे.

भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

विशेष म्हणजे राज्य आणि देशातील सध्या घडीतला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे बडे नेते गिरीश महाजन यांनीबाबत राज ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना समविचारी म्हटलं आहे. “ते येत असतील तर कुणाला हरकत नसावी. जिथे चुकत असतील तर तिथे टीका केली पाहिजे. आम्ही समविचारी आहोत. उलट ते सोबत आले तर महायुतीची ताकद वाढेल. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

राज ठाकरे महायुतीसाठी महत्त्वाचे का आहेत?

राज ठाकरे महायुतीसाठी महत्त्वाचे आहेत. कारण राज ठाकरे हे प्रभावी व्यक्तीमत्व आहेत. त्यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी फार लांबून नागरीक सभास्थळी जात असतात. राज ठाकरे यांच्या वक्तृवाची शैली देखील तडफदार आहे. ते निवडणुकीच्या प्रचारावेळी जे भाषण करतात ते अत्यंत प्रभावी आणि पुराव्यासकट करतात. ते मोठ्या स्क्रिनवर व्हिडीओ दाखवून विरोधकांच्या कामांची चिरफाड करतात. त्यांनी याआधी मोदी सरकारच्या कामांवर पुराव्यासह टीका केलीय. त्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर सत्ताधारी पक्षांची ताकद वाढणार आहे. त्यासाठीच महायुतीकडून त्यांना सोबत निवडणूक लढवण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.