भाजपने पुण्यातून विधानसभेचे रणशिंग फुंकल्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर दिसत आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन मध्यरात्री अमित शाह यांची भेट घेतली. या आठवड्यात ते दोनदा केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले आहे. अर्थात ही भेट विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि विरोधकांचे उट्टे काढण्यासाठी महायुती विधानसभा निवडणुकीकडे एक संधी म्हणून पाहत आहे. पण महायुतीत पण जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. विधानसभेसाठी अजितदादांची मोर्चे बांधणी सुरु केली आहे. तर शिंदे सेना पण मैदानात उतरली आहे. तर भाजपसमोर किती जागा सहकारी पक्षाला सोडाव्यात हा मोठा पेच आहे.
आता नको प्रतिक्षा
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अमित शाह यांच्या भेटी दरम्यान अजितदादांनी जागा वाटपाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी रेटली. लोकसभेसारखे जागा वाटपाचे गुऱ्हाळ न लांबविण्याची आग्रही मागणी करण्यात आली. विधानसभेसाठी अगोदरच जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 288 जागा असलेल्या विधानसभेसाठी अजित पवार यांच्या एनसीपीने 80 ते 90 जागांवर दावा केला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 100 जागांवर हक्क सांगितला आहे. तर भाजप राज्यात 170-180 जागा लढवू इच्छित आहे.
अजितदादांचे काय गणित
2019 मध्ये राष्ट्रवादी पक्षाने 54 जागांची कमाई केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अजितदादांनी या जागांवर दावा सांगितला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धूळ चारून पराभवाचा वचपा काढण्याची तयारी सुरु आहे. अजित पवार यांनी गेल्यावेळी काँग्रेसने उमेदवार उभे केलेल्या 20 जागांवर सुद्धा निवडणूक लढवू इच्छित असल्याचे वृत्तात म्हटले आहे. या जागा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील शहरी भागातील 4-5 जागांवर पण दादांचा डोळा आहे. हे मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहेत. या भागात मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे. तिथे अजितदादांची राष्ट्रवादी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.
भाजपपुढे पेच
बजेटमध्ये केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेशाच्या झोळीत झुकते माप टाकले आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या विशेष राज्याचा प्रयोग गुंडाळण्यात भाजपला यश आले असले तरी या राज्यांना मोठा निधी द्यावा लागला आहे. महाराष्ट्रात शिंदे सेना आणि अजित पवार गटाने अजून मोठा दबाव टाकला नसला तरी दोन्ही पक्ष विधानसभेसाठी अधिक जागांवर आग्रही असल्याने भाजप पुढे पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.