काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यातील वाद टोकाला पोहचला होता. त्या वादानंतर गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तो वाद अजूनही धगधगत आहे. गणपत गायकवाड कारागृहात आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील शिवसेना आणि भाजपमधील वाद पेटला आहे. महेश गायकवाड यांनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा सल्ला दिला आहे.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर दोघांमधील तणाव आणखी वाढला. गणपत गायकवाड सध्या या प्रकरणात जेलमध्ये आहेत, परंतु भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुखपद दिले आहे, आणि त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने देखील या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. शहरप्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, आणि शिंदे गटाचे पदाधिकारी विशाल पावशे हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महेश गायकवाड यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना भाजपने उमेदवारी दिली तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, गेल्या पंधरा वर्षांत कल्याण पूर्वची परिस्थिती बकाल झाली आहे. पाणी समस्या, रस्त्यांची दुरवस्था, शासकीय रुग्णालयाचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे भाजपने गणपत गायकवाड यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास बंड पुकारून अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. आता विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते या तणावावर काय भूमिका घेतात आणि ही जागा कोणाच्या वाट्याला जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.