मुंबई : मुंबईच्या विशेषतः माहिमच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील असा माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते आज (दिनांक 2 सप्टेंबर 2021) सायंकाळी करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या वतीने माहीम समुद्र किनारी पर्यावरणपूरक असे सौंदर्यीकरण करण्यात आले असून मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण आता खुले झाले आहे. (Mahim Beach Beautification Project completed by Mumbai Municipal Corporation inauguration done by aditya thackeray)
या लोकार्पण प्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, स्थानिक नगरसेवक तथा माजी महापौर मिलिंद वैद्य, नगरसेविका तथा माजी महापौर श्रद्धा जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम, माहिम समुद्र किनाऱ्यावरील सुशोभिकरणास बाधित होत असलेल्य 5 झोपडीधारकांना पर्यायी जागा देण्यात आली. त्यानंतर सदर झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. तसेच, समुद्र किनाऱ्यालगतचा संपूर्ण कचरा तसेच नको असलेले दगड इत्यादी हटवण्यात आले. संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यानंतर, पाण्यामुळे किनाऱ्याची बरीच धूप झाली होती. निर्माण झालेली खोली भरुन काढण्यासाठी आणि भविष्यात धूप होऊ नये, यासाठी संपूर्ण माहीम समुद्र किनाऱ्यावर तब्बल 5 फूट उंचीपर्यंत वाळू पसरविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाच्या कामातून उपलब्ध होणारी वाळू आणल्याने त्यासाठी महानगरपालिकेवर वेगळा आर्थिक भार पडलेला नाही. यासोबत, समुद्र किनारा संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यात आली असून या भिंतीवर माहीम परिसरासह मुंबईची सांस्कृतिक वैशिष्ट्ये दर्शविणारी ललित चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर म्हणून, तळहातामध्ये झाड जपल्याचे सुंदर असे नैसर्गिक शिल्पदेखील साकारण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन सुरक्षित हातांमध्ये असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे. किनाऱ्यावर विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये वादळी हवेचा वेग कमी करण्याची क्षमता असणारे सुरु या झाडाच्या 200 रोपांची लागवड करण्यात आली आहे. सोबत, टिकोमाची 350 आणि चाफ्याची 200 तर बांबूची 300 रोपे लावण्यात आली आहेत. संपूर्ण सुशोभित किनाऱ्याभोवती बांबूचे कुंपण लावण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी लावण्यात आलेले व्यायामाचे साहित्य व उपकरणे इत्यादी लाकडापासून बनवलेले आहे.
या समुद्र किनाऱ्यावर दगडाची पायवाट बनविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना किनाऱ्यावर सुलभतेने फिरता येईल. तसेच, माहीम किनारा परिसर न्याहाळता यावा, म्हणून सुमारे 30 मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा (Viewing Tower) उभारण्यात आला आहे. या मनोऱ्यावरुन वांद्रे-वरळी सागरी सेतूसह अरबी समुद्राचे मनोहारी दृश्य पाहता येते.
एकूणच, माहिम समुद्र किनाऱ्याचे एकप्रकारे पुनरुज्जीवनच करण्यात आले असून ही कामे करताना पर्यावरण पूरक, पर्यावरण संवर्धक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन रुप धारण केलेला संपूर्ण माहीम किनारा हा नैसर्गिक अनुभूती देणारा ठरतो आहे. जवळपास 4 कोटी रुपये खर्च करुन हे संपूर्ण सुशोभिकरण करण्यात आले आहे.
इतर बातम्या :
मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार, पण महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…
MPSC परीक्षार्थींना शनिवारी लोकल प्रवासाची परवानगी, शेलारांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई महापालिका म्हणते, ‘या’ दिवशी कोणालाही पहिला डोस दिला जाणार नाही
(Mahim Beach Beautification Project completed by Mumbai Municipal Corporation inauguration done by aditya thackeray)