नालासोपारा : वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात इन्स्टाग्रामवर रिल्स बनविण्यासाठी केमिकल्सने आग लावणाऱ्या त्या तरुणावर अखेर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्ला प्रेमींनी या घटनेसंदर्भात आपला तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर पुरातत्व खात्याच्या पत्रावरून प्राचीन स्मारके आणि पुराण वस्तू जागा व अवशेष याबाबत अधिनियम 1958 चे कलम 30 (1) नुसार वसई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाशिम शेख असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो फरार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाने वसई किल्ल्याच्या पुरातन चर्चमध्ये एका शिलालेखावर केमिकलचे ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला होता. या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी किल्ला प्रेमींतर्फे करण्यात आली होती.
त्यानंतर या प्रकरणी पुरातत्व विभागाला माहिती मिळताच पुरातत्व विभागाचे वसई किल्ला संवर्धक सहाय्यक कैलास शिंदे यांनी सोमवारी वसई पोलिसात या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले होतं. त्यावर वसई पोलिसांनी सोमवारीच रात्री उशिरा आठ वाजता गुन्हा दाखल करून तरुणांचा शोध सुरू केला आहे.
वसई किल्ल्याच्या एका पुरातत्व चर्च मध्ये ज्वलनशील पदार्थ टाकून, एका शिलालेखावर आग लावल्याचा व्हिडीओ समोर आला.
आम्हाला पुरातत्व विभागाचे पत्र मिळताच आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितले. पुरातत्व किल्ल्याचे अवशेष पुढच्या पिडीसाठी टिकले पाहिजेत. वसईचा किल्ला पुरातन आहे.
आग लावून रिल्स बनविणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे पण या किल्ल्यात येऊन किल्ल्याची नासधूस करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक असला पाहिजे असं मत किल्ला संवर्धक श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केले आहे.