उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज मुंबईत आल्या आहेत. ममता बॅनर्जी मुंबईत येताच त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बातचित झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी एकत्रितपणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ममता बॅनर्जी यांचा पक्ष हा इंडिया आघाडीतला महत्त्वाचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची राजकीय मैत्री आहे. याआधीदेखील ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट झाली आहे. दरम्यान, आजच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी ही आमची कौटुंबिक भेट असून या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही, असं म्हटलं आहे. तर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार हे स्थिर नाही, असं ममता बॅनर्जी स्पष्ट म्हणाल्या आहेत.
केंद्र सरकारने 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू झाली होती. याच 25 जून तारखेबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. यापुढे 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने आणीबाणीच्या विरोधात हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. “सर्वात जास्त आणीबाणी तर मोदींच्या काळातच होतेय. आम्ही आणीबाणीला पाठिंबा देत नाहीत. पण कोणीतीही चर्चा न करता मोदी सरकारने निर्णय घेतला”, अशी टीका ममत बॅनर्जी यांनी केली.
“मी उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत आहे. मी मुंबईत येते तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटते. शरद पवार हे तर ज्येष्ठ नेते आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकी आहेत. या विधानसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलं. केंद्र सरकार कसं स्टेबल आहे ते तुम्हीच आम्हाला सांगा, असं देखील मोठं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं. तसेच मला कुणाच्याहीबद्दल काही म्हणायचं नाही, अशीदेखील प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिली.
“ही आमची कौटुंबिक मुलाखत होती. यामध्ये राजकारण आणू नका. आम्हाला जे म्हणायचं असतं ते आम्ही उघडपणे बोलतो. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्हाला जिथे जे बोलयचं आहे तिथे आम्ही बोलत आणि बोलत राहू. पण मला एवढंच सांगायचं आहे की, ही कौटुंबिक भेट आहे. कृपया करुन यामध्ये राजकारण आणू नका”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.