नवी मुंबई | 29 जानेवारी 2024 : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांचा राजा अर्थात कोकणातील हापूस आंब्याची धडाकेबाज एंट्री झाली आहे. एपीएमसी बाजारात पहिल्या वेळेला तब्बल 365 पेट्या दाखल झाल्या आहेत. हा हापूस भाव खावून जात असल्याचे दिसत आहे. पेटीला 6 हजारापासून तब्बल 11 हजारांच्यावर भाव मिळत आहे. खरंतर ही आवक एप्रिल महिन्यात होते. मात्र कोकणातील आंबा बागायतदार लवकर पीक घेत असल्याने आंब्याची आवकही लवकर होत आहे. आता दाखल झालेला आंब्याची मोहोर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेतल्याने पीक लवकर आलं. त्यामुळे आंबा तयार होऊन तो वेळेआधीच बाजारात दाखल झाला आहे.
मात्र या मोहोराला अवकाळी पाऊस झाल्याने रोगाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता दाखल झालेला आंबा कमी प्रमाणात आहे. एप्रिल – मे मध्ये चांगली आवक एपीएमसी बाजारात होऊ शकते, आणि त्याचा परिणाम दरावरही होईल अशी आशा आंबा विक्रेत्यांनी केली आहे. कोकणातील हापूसला देशा बरोबर परदेशातही मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात कोकणातील हापूस विदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. याआधी बाजारात रत्नागिरी, दापोलीमधून आलेला हापूस विकला गेला आहे. मात्र या वर्षीच्या हंगामाला तीन ते चार महिने आधीच सुरुवात झाली आहे.
एप्रिल-मे मध्ये हीच आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधून मोठी आवक होणार आहे. याचे दर आंबा बागयतदारांना आणि विक्रेत्यांना सुगीचे दिवस आणणारे आणणारे असतील. तर आंबा खवय्यांनाही परवडणारे असतील, असे आंबा विक्रेत्यांनी सांगितले. मात्र आता आलेला आंबा खरेदीसाठी खवय्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. या आंब्याला भावही चांगला मिळत आहे. तरीही अजून भरघोस खरेदी आणि कुणाला भेट द्यायची असेल आणि दर ही परवडणारे हवे असतील तर अजून तीन महिने वाट पाहवी लागेल, विक्रेत्यांचं म्हणणं आहे.