मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची मुंबईत आज रात्री साडेदहा वाजता बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ जालन्याहून मुंबईसाठी रवाना झालंय. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यासोबत हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झालंय. या शिष्टमंडळाने संभाजीनगर विमानतळापर्यंत रस्ते मार्गाने प्रवास केला. त्यानंतर संभाजीनगर विमानतळाहून विशेष विमानाने हे शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेला रवाना झालं. या शिष्टमंडळाची संभाजीनगर येथे बैठक पार पडली. त्यानंतर हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झालं. आता हे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय. या शिष्टमंडळाची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे.
मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची आज रात्री साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे सरकारसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावेत यासाठी शिष्टमंडळाची समजूत काढली जाण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा नागरिकांसाठी जीआर काढलाय. पण या जीआरमध्ये जुन्या नोंदींमध्ये कुणबी वंशावळ असेल तर मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र दिलं जाईल, असं म्हटलं आहे. पण मनोज जरांगे यांची सर्वांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी, अशी मागणी केलीय. याबाबत मनोज जरांगे यानी दुरुस्ती सूचवली आहे.
राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर अर्जुन खोतकर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी राज्य सरकारचा जीआर जरांगे यांना वाचून दाखवला होता. जरांगे यांनी त्या जीआरमध्ये दुरुस्ती सूचवली होती.त्यावर खोतकर यांनी दुरुस्ती सूचवायची असेल तर मुंबईत यावं लागेल, असं सांगितलं होतं. त्यावर जरांगे यांनी आमचं शिष्टमंडळ येईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर आज मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांना जीआरवर तोडगा सूचवणार आहे. त्यावर मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.