मनोज जरांगे यांनी हात जोडले…म्हणाले, बाबांनो, ही….

| Updated on: Dec 28, 2023 | 5:54 PM

प्रत्येकाने घरातून बाहेर पडायचं आहे. येत्या 10 ते 15 दिवसात तुमची सर्व कामं आटोपून घ्या. शेतीतील कामे पार पाडा. कापूस विकायचा असेल तर विकून टाका. ऊसतोड करायला चाललो असं समजूनच सर्व संसार सोबत घ्या. विंचवाचं बिऱ्हाड घेऊन यायचं आहे. बेसावध होऊन जायचं नाही, सर्व साहित्य सोबत घ्या. आपल्याला कुणावरही अवलंबून राहायचं नाहीये, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांनी हात जोडले...म्हणाले, बाबांनो, ही....
Manoj Jarange Patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई पुकारली आहे. सरकारशी अनेकदा चर्चा झाली. अनेक आश्वासने मिळाली, पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे मराठा समाजात अत्यवस्था पसरली आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईला धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 जानेवारी रोजी भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाला हात जोडून विनंती केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी ही विनंती केली. 200 पेक्षा अधिक लोकांनी बलिदान दिलं आहे. त्यांचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. अंतरवलीत लोक पायी चालत आलेत. त्यांचे श्रम वाया जाऊ देणार नाही. घराच्या बाहेर पडा. एवढीच संधी आहे. हातजोडून कळकळीची विनंती आहे. शेवटचा लढा आहे. तुम्ही पोरांना आयुष्याची प्रॉपर्टी दिली ना. तसंच हे आरक्षण आहे. ही आयुष्याची प्रॉपर्टी आहे. आरक्षण देण्यासाठी बाहेर पडा, असं कळकळीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. जरांगे पाटील यांनी हातजोडून ही विनंती केली.

सुट्ट्या टाका, पण घराबाहेर पडा

तुमचं शिकलेलं पोरं एका टक्क्यामुळे घरी पडलं आहे. त्याला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आपल्याच जातीसाठी लढा. मला माहीत आहे, माझा समाज घरी बसणार नाही. काम बुडालं तरी हरकत नाही. रजा टाकली तरी हरकत नाही. 10 ते 15 दिवसात कामं उरका आणि मुंबईकडे वळा. तुमच्या साथीची गरज आहे. खांद्याला खांदा लावून उभं राहा, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.

सर्वच जण सामील व्हा

मुंबईला येणाऱ्यांना गावकऱ्यांनी शिधा किंवा जास्त दिवस टिकेल एवढं वाण सामान द्यावं. आपलं लेकरू म्हणून सामान द्या. अर्धा क्विंटल, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ घ्या, टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर, सरपण, तवा, पातेल सोबत घ्या. तुम्ही तुमच्या तयारीने या. कुणावरही अवलंबून राहू नका. ट्रकमधून येत असाल तर ट्रकच्या कप्प्यात सामान ठेवा. आपल्या वस्तुंची काळजी आपणच घ्यायची आहे. जाणाऱ्यांना वांट लावण्यासाठी सर्व गावकरी वाटं लावायला या. शेतकऱ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सर्वजण सामील व्हा. अजून या यात्रेला नाव देणे बाकी आहे, असंही त्यांनी सांगितलं.