मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत स्वत: छगन भुजबळ यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. भुजबळ यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच भुजबळ यांच्या राजीनाम्यावर अनेक तर्कवितर्कही व्यक्त केले जात आहे. राजकीय वर्तुळातूनही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता. पण आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक बोलतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
आमदार संजय गायकवाड यांनीही छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला की नाही मला माहीत नाही. त्या राजीनाम्याची प्रत सुद्धा बाहेर आली नाही, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजीनामा दिला की नाही याबाबत छगन भुजबळ यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही. भुजबळ काय बोलले, त्यांच्या काय भावना आहेत या निश्चितपणे आम्ही जाणून घेऊ आणि मगच त्यावर प्रतिक्रिया देऊ. अहमदनगरचे भाषण मी ऐकले नाही. मी त्यांच्याशी जरूर बोलेल. समजून घेईल आणि त्या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया देईल, असं सुनील तटकरे म्हणाले. भुजबळ कधीही पक्ष सोडणार नाहीत. भुजबळ आज जे काही बोलले त्याबाबत मी आज रात्री किंवा उद्या सकाळी त्यांच्याशी बोलेल आणि प्रतिक्रिया देईन, असंही तटकरे यांनी सांगितलं.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ यांनी 17 नोव्हेंबरला झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भुजबळ यांना राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळ यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुसरा विदुषक बाहेर निघाला. ते म्हणजेओबीसी बांधव आणि सरकारला सुद्धा कलंक आहेत, असं सांगतानाच आमची विजयी सभा मोजायला ये, असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी केलं.