नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. सरकारच्या शिष्टमंडळाने आज जरांगे यांच्याशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत कोणतंही अधिकृत सुतोवाच केलेलं नाही. आज दुपारीच 2 वाजता मनोज जरांगे पाटील आपली निर्णायक भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासोबतचं भगव वादळ मुंबईत धडकणार की हे वादळ मुंबईच्या वेशीवरूनच परत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात आला आहे. त्यावर मनोज जरांगे यांचं समाधान झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे आज त्यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे यांचं लाँगमार्च नवी मुंबईत धडकला आहे. त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण साऊंड सिस्टिमचा खोळंबा झाल्याने त्यांनी दुपारी 2 वाजता सर्वांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा जीआर वाचून दाखवायचा आहे. प्रत्येक शब्द समाजाला कळला पाहिजे. काय निर्णय झाला समजलं पाहिजे. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत आवाज ऐकायला आला पाहिजे. त्यामुळे साऊंड सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत तासाभराचा ब्रेक घेऊ. दुपारी 2 वाजता मी तुमच्याशी संवाद साधतो. परत भेटू. तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या. जेवणाची व्यवस्था केली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मी फक्त शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मायबापापुढे ठेवून निर्णय घेतो असं सरकारला सांगितलं. आपण रिकाम्या हाताने परत जायचं नाही. काय मिळालं? काय नाही? हे तुम्हाला कळलं पाहिजे. आरक्षण मिळाल्याशिवाय हालणार नाही. तुम्हाला सरकारने दिलेला कागद वाचून दाखवणार. आपलं हित आहे की नाही हे तुम्हीच ठरवा, असं सांगतानाच समाज आणि समाजासाठी काम करायचंय म्हणून तुम्हाला विश्वासत घेत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील रात्रीच नवी मुंबईत आले. काल त्यांचा वाशी मार्केटमध्ये मुक्काम होता. आज दुपारी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्याशी चर्चा केली. यात सरकारकडून मंगेश चिवटेही होते. रणरणत्या उन्हातच ही चर्चा सुरू होती. त्यामुळे मंगेश चिवटे यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
जरांगे यांच्यासोबत लाखो लोक आले आहेत. नवी मुंबईत जिकडे तिकडे माणसांचीच गर्दी आहे. पाय ठेवायलाही जागा नाही. रणरणत्या उन्हातही लोक बायका पोरांना घेऊन आले आहेत. डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवा झेंडा घेऊनच हे लोक आले आहेत. एक निर्धार करून हे सर्वजण नवी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे हे आंदोलन किती दिवस चालणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.