Maharashtra Drought Situation | महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस?

| Updated on: Sep 20, 2023 | 9:41 PM

महाराष्ट्रात यावर्षी हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवलेली आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये प्रचंड कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं.

Maharashtra Drought Situation | महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस?
Follow us on

मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : राज्यातल्या 36 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे, आणि दुसरीकडे कांद्याची खरेदी आणि टोमॅटोचे पडलेल्या दरांचा मुद्दा पुन्हा समोर येऊ लागलाय. कांदा आणि टोमॅटोवरुन शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद पुकारलाय. सरकारच्या आश्वासनानंतरही लासलगावच्या दोन्ही केंद्रांवर नाफेडद्वारे खरेदी होणारे केंद्र बंद आहेत. 2410 रुपयांचा दर असूनही जिल्ह्यातील काही केंद्रावर 2000 रुपये दराने खरेदी होतेय.

सोंग ढोंग करू सरकारने हा प्रयत्न केला होता, निर्यात दर वाढल्याने अडचण झालीय. भाव मिळत नाही, कांद्याला दर मिळत आहे, महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, भारताच्या सीमेवर कांदा सडत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल की २ लाख टन कांदा खरेदी करू मात्र ३८ लाख टन कांद्याची माती केली, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

नाशिकच्या येवल्यामध्येच भाव न मिळाल्यानं महामार्गाच्या कडेला टोमॅटो फेकून दिले गेले. दीड महिन्यांपूर्वी २५० रुपयांवर गेलेला टोमॅटो आता १ ते ३ रुपये किलोला मिळतोय. त्यामुळे उत्पन्नही निघत नसल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना गुरांपुढे टोमॅटो टाकून दिलेत. कांदा-टोमॅटोबरोबरच दुष्काळाचंही संकट घोंगावतंय. राज्याच्या 36 पैकी 13 जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. सांगली-सातारा-जालना-नगर-बीडमध्ये यात आघाडीवर आहेत.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती कमी टक्के पाऊस?

  • १३ जिल्ह्यांत गेल्या अडीच महिन्यात सरासरी पावसाची तूट २० टक्क्यांहून अधिक आहे
  • नगर जिल्ह्यात सरासरी 45 टक्के कमी पाऊस झालाय
  • सांगलीतही सरासरी 45 टक्के कमी पाऊस
  • नांदेडमध्ये सरासरीच्या १९ टक्के कमी
  • सोलापुरात सरासरीच्या ३५ टक्के कमी
  • साताऱ्यात सरासरीच्या ४० टक्के कमी
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी २७ टक्के कमी
  • जालन्यात सरासरीच्या ४३ टक्के कमी
  • बीडमध्ये सरासरीच्या ४३ टक्के कमी
  • धाराशिवमध्ये सरासरीच्या ३२ टक्के कमी
  • परभणीत सरासरीच्या ३१ टक्के कमी
  • अमरावती सरासरीच्या ३० टक्के कमी
  • वाशीममध्ये सरासरीच्या २२ टक्के कमी
  • अकोल्यात सरासरीच्या २९ टक्के कमी पाऊस झालाय
  • अपवाद म्हणून फक्त कोकणात सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त पाऊस झालाय.,

टँकरद्वारे पाणी पुरवठा

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या अनेक गावं पूर्णपणे पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहेत. सध्या प्रशासनाकडून गावांसाठी टँकरची 1 खेप मंजूर होतेय. पण ती सुद्धा 8 ते 10 दिवसातून एकदाच मिळते. नगर जिल्हयात 82 गावे आणि 472 वाड्यांवर पाणीटंचाई आहे. सध्या 75 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय.

शेतकऱ्यांच्या सातबारांवर बँकेने चक्क जप्तीचा बोजा चढविल्याच्या नोंदी

शेतकऱ्यांची अवस्था बिकट असताना बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. केंद्रीय सहकारी बँकेच्या एका निर्णयानं शेतकऱ्यांसह शेतकरी नेते संतापले आहेत. जिल्हा केंद्रीय बँकेने थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या मालमत्तेची जप्ती सुरू केलीय. शेतकऱ्यांच्या सातबारांवर बँकेने चक्क जप्तीचा बोजा चढविल्याच्या नोंदी केल्या आहेत. त्यामुळे बँकेनं विश्वासघात केल्याचा आरोप होतोय.