‘आमच्या कोणत्याही आंदोलकाला अटक करु नका, केली असेल तर…’, मनोज जरांगे यांचं पोलिसांना आवाहन

| Updated on: Jan 26, 2024 | 7:02 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीबाबत मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी सरकार महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

आमच्या कोणत्याही आंदोलकाला अटक करु नका, केली असेल तर..., मनोज जरांगे यांचं पोलिसांना आवाहन
Follow us on

मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्या मान्य केल्याचा मसुदा सुपूर्द केला. पण मनोज जरांगे अध्यादेशाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य करुन अध्यादेश पाठवला नाही, तर आपण भव्य मोर्चा घेऊन मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला जाणार असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्यासह मुंबई पोलीस सहआयुक्त कायदा सुव्यवस्था सत्य नारायण चौधरी, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आले. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडली. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सरकारला मोलाचं आवाहन केलं.

मनोज जरांगेंचं पोलिसांना आवाहन

“सरकार आणि गृह विभागाकडून अजिबात समज-गैरसमज पसरता कामा नये. कोणताही मुलगा काही करणत नाही. ते शांततेत मुंबईत आले आहेत. त्यांना गल्ल्या माहिती नाहीत. त्यांना कोणत्या मार्गाने कुठे जायचं हे माहिती नाही. ते मुंबईत आल्यामुळे वाहतूक कोंडी होत असेल, कुठेही वाईट करायचं असं आमचं एकाही आंदोलकाच्या मनात नाही. आमच्या कोणत्याही आंदोलकाला अटक करु नये. अटक केली असेल तर त्याला सोडून द्यावं. कारण आम्ही सर्व शांततेत आंदोलन करत आहोत”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“आम्ही नाकारत नाहीत. तुमची ट्राफीक जाम झाली असेल. झाली नाही, अस आम्ही म्हणणार नाही. मराठा आंदोलकांना मुंबईतील रस्ते माहिती नाहीत. जाणूनबुजून अजिबात नाही. असं एकाही मराठा आंदोलकाकडून होणार नाही. त्यांना पोलीस बांधवांनी साथ द्यावी आणि सर्वांना तातडीने सोडून द्यावं”, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली.

जरांगे पाटील यांना भेटायला आले पोलीस अधिकारी

दरम्यान, पोलीस अधिकारी वीरेंद्र मिश्रा, विनायक देशमुख आणि पुरुषोत्तम कराड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाचं सध्याचं आरक्षण आणि त्यांची आगामी काळातील भूमिका, कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.