मुंबई : “मराठा समाजाला न्याय द्या, ही आमची हात जोडून विनंती आहे. येत्या काळात जर न्याय मिळाला नाही तर केवळ सरकारविरोधातच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही मराठा समाज सोडणार नाही. त्यांच्याही घरी आम्ही मोर्चा काढू. बंगल्यावर आंदोलन करु. त्यांच्या काळातही मराठा आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आता पेटून उठू”, असा इशारा मराठा आंदोलकांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना दिला आहे (Maratha Protester warn to Maharashtra Government and opposition party).
मराठा समाज आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आज (11 नोव्हेंबर) पुन्हा रस्त्यावर उतरला. मुंबईतील जांबोरी मैदानात मराठा क्रांती मोर्चाने आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आंदोलन पुकारलं. जांबोरी मैदान ते दहीसरपर्यंत मराठा संघर्ष यात्रा काढण्यात आली. या अभियानात शेकडो मराठा आंदोलक सहभागी झाले. आंदोलकांनी मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
“मेडीकल, इंजीनियरिंग आणि अकरावी प्रवेशाचा मुद्दा प्रलंबित आहे. सरकार याबाबत उदासिन आहे. यासाठी मराठा जोडो अभियान सुरु आहे. आम्ही हे आंदोलन लवकरच आणखी प्रखर करणार”, असा इशारा आंदोलकांनी दिला (Maratha Protester warn to Maharashtra Government and opposition party).
“सरकारला मराठा समाजाचं सोयरसुतक आणि काळजी नाही. पंढरपूरहूनही एक दिंडी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघाली. तीलाही काल अडवण्यात आलं. सरकार दडपशाही करत आहे”, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
“सरकारला आरक्षण द्यायचं नाही, फक्त राजकारण करायचं आहे. अकरावी, मेडीकल आणि इंजीनियरिंगचा प्रवेशाचा विषय मोठा आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी याबबात मोठी घोषणा करावी”, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाकडून काल (7 नोव्हेंबर) मुंबईत मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. हा मशाल मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर धडकला होता. यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली होती. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मातोश्री बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेट देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली होती.
संबंधित बातम्या : राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं, चंद्रकांत पाटील राज्यपालांना का भेटले याची कल्पना नाही : गुलाबराव पाटील