मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आज पुन्हा एकदा ट्विट केलंय. तेजस्विनी हिने काल टोलच्या मुद्द्यावर भाष्य करणारं एक ट्विट केलं होतं. यावेळी तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं दिसलं. महाराष्ट्रात चारचाकी आणि लहान गाड्यांसाठी टोलमुक्ती केलीय. तर केवळ मोठ्या कमर्शियल गाड्यांकडून टोल घेतला जातोय, असं फडणवीस म्हणाले आहेत. त्यावर तेजस्विनीने प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तेजस्विनी हिच्या ट्विटर अकाउंटवरची व्हेरिफाईड असलेली ब्लू टिक हटली आहे. याच मुद्द्यावरुन तिने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
“म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून”, असं ट्विट तेजस्विनी पंडितने काल देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओसोबत केलं होतं.
“जी घोषणा आम्ही त्यावेळेस केली होती त्यानुसार राज्यातील सर्व टोल नाक्यांवर चारचाकी आणि छोट्या गाड्यांना टोलमधून मुक्ती दिली आहे. केवळ कमिर्शियल मोठ्या गाड्यांकडून महाराष्ट्रात आपण टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारच्या निधीतून दिले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. यानंतर तेजस्विनीने आणखी एक ट्विट केलंय.
तेजस्विनीने “कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही”, अशा शिर्षकाखाली ट्विटरवर पोस्ट केलीय. “माझ्या ट्विटर अकाउंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक आम्हा जनतेची इतकी वर्ष फसवणूक झाली, असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?”, असं तेजस्विनी म्हणाली आहे.
“ट्विटर अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसाच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही”, असं तेजस्विनीने म्हटलं आहे.
#महाराष्ट्र #टोलधाड #लोकशाही_धाब्यावर #NoDemocracy #MaharashtraPolitics pic.twitter.com/Y5UHyIVO6S
— TEJASWWINI (@tejaswwini) October 10, 2023
“सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे. हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा जय हिंद जय महाराष्ट्रसाठीचा जय घोष योग्य वेळी सुरुच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे”, असं तेजस्विनी पंडित म्हणालीय.