मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. यावरुन भाजपने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा आम्ही कधीही केलेला नव्हता. त्यामुळे विरोधी पक्ष जे म्हणतात, त्यात काही तथ्य नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar On Rain Water Logging)
“विरोधी पक्षाचे नेते कायम आरोप करत असतात. त्यांचं ते कामच असतं. त्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्या जागी योग्य आहे. पण ते जे म्हणतात त्यात काहीही तथ्य नाही,” असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
“मुंबईमध्ये पाणी साचणार नाही असा दावा आम्ही कधीही केला नव्हता. पण यंदा मुंबईत पूर्वीपेक्षा पाणी साचायचे प्रमाण कमी झाले आहे,” असेही महापौरांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे “पी. एम. केअर फंडातून देण्यात आलेले व्हेंटिलेटरवर हे पडून नाहीत. तर ते हाताळण्यासाठी आमच्याकडे आवश्यक स्टाफ नाही. आम्ही स्टाफची भरती करत आहोत. त्यामुळे ते व्हेंटिलेटर पडून नाहीत,” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान मुंबईत विविध भागात पाणी साचल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महापालिकेवर टीका केली आहे. “आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने तीन तेरा वाजवले, 113 टक्के नालेसफाईचे दावे करणारे कुठे आहेत,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.
“मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झालेले मुंबईकरांनी पाहिलं. आयुक्त दावा करत होते की 113 टक्के नालेसफाई केली. त्यावेळी मी आयुक्तांना 227 टक्के तुमचा दावा फोल आहे असे आवाहन केले होते. कंत्राटादारांना पाठीशी घालणारे सत्ताधारी आणि अधिकारी हे यामागे खरे दोषी आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा जीव असुरक्षित करु नका. कंत्राटदारांना पाठीशी घालू नका. मुंबईचं तुंबई तुम्ही करुन दाखवलं, त्या अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावचं लागेल,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. (Mumbai Mayor Kishori Pednekar On Rain Water Logging)
संबंधित बातम्या :
आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने तीन तेरा वाजवले, 113 टक्के नालेसफाईचे दावे करणारे कुठे आहेत? : शेलार