बाबा सिद्दिकी यांची मुलगी राजकारणापासून दूर ‘या’ क्षेत्रात करतेय काम

| Updated on: Oct 13, 2024 | 1:25 PM

सिद्दिकी हे आपल्या आमदार पुत्राच्या कार्यालयाबाहेर आले असताना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघांपैकी दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी सिद्दिकी यांच्या छातीत लागली.

बाबा सिद्दिकी यांची मुलगी राजकारणापासून दूर या क्षेत्रात करतेय काम
बाबा सिद्दिकी यांचं कुटुंब
Image Credit source: Instagram
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांचे पुत्र, आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मलनगर परिसरातील कार्यालयाबाहेरच घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिद्दिकी यांच्या पश्चात त्यांची पत्नी शहजान सिद्दिकी, मुलगा झिशान सिद्दिकी आणि मुलगी अर्शिया सिद्दिकी असा परिवार आहे. झीशान यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. परंतु सिद्दिकी यांच्या मुलीने करिअरसाठी पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला.

अर्शिया सिद्दिकीचा जन्म 29 जुलै 1989 रोजी झाला. तिने डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ती युसीएलमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली. अर्शियाने मेडिसीन आणि सर्जरीमध्ये बॅचलरची पदवी संपादित केली. त्यानंतर तिने एमबीबीएस आणि एमएससी मॅनेजमेंट अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी पूर्ण केली.

शिक्षणानंतर अर्शियाने काही काळासाठी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. मात्र काही महिन्यांतच तिने हे क्षेत्र सोडलं आणि डॉक्टर बनण्यावर लक्ष केंद्रीत केलं. 2011 पासून ती विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक करत आहे. सर्वांत आधी तिने Zears Impex ही कंपनी स्थापित केली. त्यानंतर 2016 मध्ये ती अमेरिकेतील Skrite Labs या कंपनीची सहसंस्थापिका बनली. त्यानंतर वर्षभरातच ती Shopease Techsoft Private Limited ची सीईओ आणि संस्थापक बनली. सिद्दिकी कुटुंबीय हे खवय्ये म्हणून ओळखले जातात. 2022 मध्ये तिने वांद्रे इथं कुनाफा वर्ल्ड हा कॅफे सुरू केला.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच रात्री उशिरापर्यंत लिलावती रुग्णालयात नेते, कलाकार यांची रीघ लागली होती.

शनिवारी या हल्ल्याच्या काही तास पूर्वीच सिद्दिकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांनी ही पोस्ट लिहिली होती. या पोस्टद्वारे त्यांनी सर्वांना दसराच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दुर्दैवाने हीच त्यांची अखेरची पोस्ट ठरली. ‘सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. हा दसरा तुम्हा सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो’, अशी त्यांनी पोस्ट लिहिली होती.