मुंबई | 17 मार्च 2024 : “या देशाने गांधी या आडनावाच्या व्यक्तींची परीक्षा घेतली. महात्मा गांधी असो की इंदिरा गांधी असो की राजीव गांधी त्यांना परीक्षा द्यावी लागली. रक्त सांडावं लागलं. तुमच्या नावामागे गांधी आडनाव आहे. त्यामुळे तुम्हाला त्रास दिला जात आहे. या आडनावाला भाजप घाबरत आहे”, असं पीडीपी पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाल्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय. या समारोपाच्या निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भरगच्च गर्दीने संपूर्ण शिवाजी पार्क भरलंय. या सभेत संबोधित करताना मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
“निवडणुका येत आहे. मताचा सर्वात मोठा अधिकार दिला आहे. इंदिरा गांधी सर्वात प्रभावी पंतप्रधान होत्या. ज्यांनी बांगला देश वेगळा केला. त्यांनाही तुम्ही सत्तेतून बाहेर काढलं. पण मोदींनी तर खोट्या घोषणा केल्या. १५ लाखाची घोषणा केली. गॅस सिलिंडर चारशे रुपयात देणार म्हणाले. महिलांचं संरक्षण करण्याचं काम केलं. पण त्यांनी काहीच काम केलं नाही. त्यांनी पुलवामाच्या शहिदांच्या नावाने मते मागितली. त्यांच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा घडलं. आताही ते मते मागत आहे. त्यांना ४०० पार करायचं आहे. त्यांना ४०० पार का करायचे आहेत? कारण त्यांना संविधान बदलायचं आहे. त्यांना तुमचा मताचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे. त्यांना चीन सारखी हुकूमशाही आणायची आहे”, असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला.
“जम्मू-काश्मीरमध्ये संविधान संपुष्टात आलं आहे. तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन पाहा. तिथली परिस्थिती पाहा. जी अवस्था आमची आहे, तीच अवस्था तुमची होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला विचार करून मतदान करायचं आहे. तुम्ही विचार करून मतदान केलं नाही तर तुमचीही तीच अवस्था होईल”, असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.