शिंदे गटच का? भाजप का नाही?; मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्या मागचं कारण काय?

| Updated on: Jan 14, 2024 | 12:57 PM

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज दुपारी ते शिंदे गटात सामील होणार आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. देवरा यांचा राजीनामा येताच काँग्रेस नेते राहुल गांधी हे विमानतळावरून माघारी परतले आहेत. त्यांनी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिंदे गटच का? भाजप का नाही?; मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्या मागचं कारण काय?
milind deora
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 14 जानेवारी 2024 : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे देवरा कुटुंबीयांचा काँग्रेसचा 56 वर्षाचा घरोबा संपुष्टात आला आहे. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे मोठे नेते होते. वडिलांपाठोपाठ मिलिंद देवरा यांनीही काँग्रेसमध्येच करिअरला सुरुवात केली. मात्र, आज अखेर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देवरा भाजपमध्ये का गेले नाही? शिंदे गटातच का गेले? असा सवाल केला जात आहे. त्यावरच टाकलेला हा प्रकाश.

ठाकरेंमुळे गोची

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर ते काँग्रेसच्या सत्तेत केंद्रात राज्यमंत्रीही झाले होते. पण त्यानंतर झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देवरा यांचा पराभव झाला. 2014 आणि 2019च्या निवडणुकीत देवरा यांचा सलह पराभव झाला होता. त्यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी पराभूत केलं होतं. आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहे. अरविंद सावंत हे ठाकरे गटात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईची जागा मागितली आहे.

ही जागा सोडायला उद्धव ठाकरे तयार नाहीत. तर मिलिंद देवरासाठी ही जागा सोडावी म्हणून काँग्रेसने असंख्य प्रयत्न केले. पण आमचा उमेदवार त्या मतदारसंघात दोनदा विजयी झाला आहे. आम्ही ही जागा कशी सोडायची? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्याने काँग्रेसचाही नाईलाज झाला आहे. त्यानंतर काँग्रेसनेही या जागेची आशा सोडली होती.

नाईलाज झाला…

ठाकरे गट ही जागा सोडायला तयार नव्हता. त्यामुळेच मिलिंद देवरा यांचा नाईलाज झाला. आणखी पाच वर्ष संसदीय राजकारणाच्या बाहेर राहणं शक्य नव्हतं. पाच वर्षाच्या नंतरची परिस्थिती काय असेल हे सांगता येत नसल्याने देवरा यांनी थेट पक्षच सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

म्हणून भाजप प्रवेश नाही

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. शिंदे गट भाजपशी सोबत मिळून लोकसभा निवडणूक लढणार आहे. मात्र, शिंदे गटाने दक्षिण मुंबईतील जागेवर दावा केला आहे. शिंदे गट भाजपला ही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे भाजपनेही शिंदे गटाला ही जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. ही जागा शिंदे गटाकडेच येणार असल्याने मिलिंद देवरा यांनी भाजपऐवजी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मिलिंद देवरा हे भाजपमध्ये आले असते तरी शिंदे गटाने ही जागा भाजपला दिली नसती. त्यामुळे देवरा यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, असं सूत्रांचं म्हणणं आहे.