पुणे, मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी आहे. मुंबई आणि पुणे शहरात मिळणारे दूध आता महाग झाले आहे. गोकुळ दूध संघाकडून पुणे आणि मुंबई या ठिकाणी गाईच्या दूधाचा विक्री दरामध्ये वाढ केली आहे. एक जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी आहे. पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ नाही.
जून महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. तर अमूलने देखील आपल्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून नंदिनी या दुधाचे दर वाढवले होते. आता गोकुळने दुधाच्या दरात वाढ केली आहे.
मुंबई आणि पुणे शहरात मिळणारे गोकुळचे दूध महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलडणार आहे. आता दुधासाठी त्यांना जास्त खर्च करावा लागणार आहे. वाढता खर्च आणि दूध पावडरीमध्ये होणाऱ्या तोट्यामुळे दर वाढ केली असल्याचे सांगितले गेले. या दरवाढीमुळे उत्पादक आणि संघाला हातभार लागणार आहे. पुणे, मुंबईत गाईच्या दुधाची विक्री याआधी प्रतिलिटर ५४ रुपये दराने होत होती. आता हा दर प्रतिलिटर ५६ रुपये असा झाला आहे.
एकीकडे दुधाच्या दरात पुणे आणि मुंबईत वाढ झाली असताना शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे आंदोलन सुरु आहे. दूध डेअरीच्या चेअरमनसह दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करत घोषणाबाजी केली आहे. गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलनाला सुरु करण्यात आले आहे. दुधाला 40 रुपये हमीभाव मिळण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. दूध पावडर आयात करणे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असल्याचे आंदोलन कर्त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या या दूध आंदोलनाला प्रहार संघटनेकडून पाठिंबा दिला आहे. येत्या आठ दिवसांत दुधाला 40 रुपये भाव जाहीर न केल्यास प्रहार संघटनेच्या वतीने दूध गाड्या फोडण्याचा इशारा दिली आहे.
राज्य सरकारने दूध दराची घोषणा केल्यानंतरही दूध उत्पादक आक्रमक आहेत. दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी अकोले तालुक्यातील कळस गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर बैलगाडी घेऊन आणि शेण ओतून सरकारचा निषेध करण्यात आलाय. काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुंडण करत दुधाने अभिषेक घालत सरकारपर्यंत आपला आवाज पोहचवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते डॉ.अजित नवले आणि अँडव्होकेट अजित काळे हे देखील आंदोलनात सहभागी झाले.