महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान सुरु झाले आहे. आपआपली मते फुटू नये म्हणून दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसने काळजी घेतली आहे. सर्व पक्षाने आपआपल्या आमदारांना गुरुवारपासून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. स्वबळावर महायुती किंवा महाविकास आघाडीतील कोणताच उमेदवार निवडून येऊ शकत नाही, यामुळे इतर छोट्या पक्षांसोबत अपक्षांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात असदुद्दीन ओवैसी, बच्चू कडू आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांवर सर्वांची नजर आहे. बच्चू कडू यांनी आपले पत्ते उघडले असून शिंदे गटाला मतदान करणार असल्याचे म्हटले आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांवर 12 उमेदवार मैदानात आहेत. भाजपने पाच आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षानेही दोन दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची काँग्रेसचा एक, एक उमेदवार आहेत. भाजपमधून पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत निवडणूक रिंगणात आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने तर अजित पवार यांच्या एनसीपीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर उमेदवार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. यामुळे आकड्यांच्या या खेळात छोट्या पक्षांना सर्वात महत्त्वाची भूमिका बजावता आली आहे. एनडीएला अपक्ष आमदारांचा तसेच मनसे, जन सुराज्य शक्ती, भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा आहे. एकूण मिळून 203 आमदारांचा पाठिंबा आहे. यानंतरही 9 उमेदवारांना विजयी करण्यासाठी एनडीएला चार आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. याशिवाय एआयएमआयएमचे दोन आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. सपा इंडिया आघाडीत आहे, परंतु पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील आमदार अबू असीम आझमी यांनी अद्याप त्यांचे पत्ते उघड केलेले नाही. त्याचप्रमाणे ओवैसी यांनीही अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही. परंतु प्रहार जनशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी आपली रणनीती स्पष्ट केली. त्यांनी आपली दोन्ही मते एकनाथ शिंदे गटाला देणार असल्याचे म्हटले.
इंडिया आघाडी सपा आणि ओवैसीच्या पक्षांचा पाठिंबा मिळवू शकली नाही, तर त्यांच्या कोट्यातील तीनही जागा जिंकणे त्यांना अवघड होणार आहे. या परिस्थितीत खरा किंगमेकर पक्ष आता सपा आणि ओवैसी ठरत आहे.