भुजबळ यांचं जरांगेंना खुलं आव्हान, ‘तू पाटील असशील तर…’

| Updated on: Feb 09, 2024 | 1:41 AM

"जरांगे तू पाटील असशील ना, तू मंडल आयोगाला चॅलेंज करून दाखव", असं चॅलेंज छगन भुजबळांनी दिलं आहे. "तुला एवढी अक्कल नाही का? तुला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, आणि तेच तू चॅलेंज करत आहेस. एवढी ही अक्कल नाही का?", अशी टीका भुजबळांनी केली आहे.

भुजबळ यांचं जरांगेंना खुलं आव्हान, तू पाटील असशील तर...
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ
Follow us on

गिरीश गायकवाड, Tv9 प्रतिनिधी | 8 फेब्रुवारी 2024 : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना खुलं आव्हान दिलं आहे. “जरांगे पाटील स्वतःला काय समजतो मला कळत नाही. लोकशाही आहे की हुकुमशाही? त्या जरांगेला म्हणावं मुख्यमंत्र्यांना विचार. काल नाभिक समाजाच्या संघटनांनी सांगितलं की, आम्ही बैठकीला हजार होतो. मराठा समाजावर बहिष्कार टाकावा असं भुजबळ कुठेही बोलले नाही. एका सोशल मीडियावर पोस्ट आली. काही खोडसाळ लोकांनी ध चा म केला. जरांगे तू पाटील असशील ना, तू मंडल आयोगाला चॅलेंज करून दाखव”, असं चॅलेंज भुजबळांनी दिलं आहे. “तुला एवढी अक्कल नाही का? तुला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, आणि तेच तू चॅलेंज करत आहेस. एवढी ही अक्कल नाही का?”, अशी टीका भुजबळांनी केली आहे.

“मी राजीनामा दिला यामध्ये आणखीन एक कारण आहे की, आरक्षण पुन्हा नव्याने लागू करावं. यासाठी अपेक्षित सर्व्हे करण्यात यावा. एससी आणि एसटी याचा पुन्हा एकदा विचार व्हावा. तुम्ही लोक किती आहात यासाठी जातीयगणना करा. सर्वेक्षण 15 दिवसांत कसे होईल? सर्वेक्षणातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. सर्व नेत्याची ही मागणी आहे. आज एक समाज गरीब आहे त्याला आरक्षण मिळाले तर, काही वर्षांनी तो करोडपती झाला तर? आरक्षण याला पाहिजे जो हजारो वर्षांनी गरीब आहे. हे गरिबी हटावो का प्रोग्राम नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

‘आम्ही कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही’

“कितीही मोठा अधिकारी असेल तर, त्याला वागणूक नीट मिळत नाही. कारण तो दलित आहे. यासाठी त्याला आरक्षण पाहिजे. आज जे, आरक्षणात सहभागी आहेत ते लोक गावगाडा हाकत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपाचे ते मिळेल ते कामे करतात. सर्व आरक्षण आज धोक्यात आले आहे. सुरुवातीला काँग्रेस सरकारने जातीयगणना केली होती. प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होत असते. आम्ही कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. यापूर्वी दोनदा प्रयत्न केले. पृथ्वीरज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले”, असं भुजबळांनी सांगितलं.

‘मला कोणी राजीनामा मागितला नाही’

“साखर उद्योग, इतर उद्योग जमिनी सर्व या लोकांच्या आहेत. आर्थिक मागासमध्येही 8.5 टक्के मराठा समाज आहे. आम्ही राजकीय लोक मतासाठी भिकारी आहोत. बीडमध्ये आमदार लोकांचे घर जाळले. त्यांचा परिवार आतमध्ये घरात होता. यावेळी 3-4 मुस्लिम लोक नमाज पढण्यासाठी जात असताना त्यांनी मदत केली मी त्यांचा सत्कार केला. खुर्ची ठेऊन त्यांना पाठीमागील बाजूने बाहेर काढले. मी 17 नोव्हेंबरला पहिल्या सभेआधी राजीनामा देऊन गेलो होतो. मला कोणी राजीनामा मागितला नाही. तरीही माझे मन बोलत होते”, असं छगन भुजबळ म्हणाले.