Tv9 Marathi Special Report | ‘कांदे सोडा, मासे चालू करा!’, पाहा VIDEO

| Updated on: Aug 21, 2023 | 11:40 PM

मंत्री विजयकुमार गावित आणि दादा भुसे यांनी केलेल्या वेगवेगळ्या दोन विधानांमुळे नवा वाद निर्माण झालाय. त्यांच्या वक्तव्यांवर विरोधकांकडून टीका होतेय. तसेच सत्ताधाऱ्यांकडूनही त्यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या आहेत.

Tv9 Marathi Special Report | कांदे सोडा, मासे चालू करा!, पाहा VIDEO
Follow us on

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : हल्ली आपले नेते कधी-काय बोलतील, कधी काय सल्ला देतील याचा नेम नाही. मंत्री दादा भुसे यांनी दरवाढीवरुन काही काळ कांदे नाही खाल्ले तर काय बिघडेल? असा प्रश्न केलाय. दुसरीकडे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मासे खावून सुंदर त्वचा मिळवण्याचा उपाय सुचवलाय. या दोन्ही मंत्र्यांचं आवाहन शिरसावंद्य मानत नेटकऱ्यांनी मधला मार्ग सुचवलाय. नेटकरी म्हणतायत की गावितांनी सुचवलेल्या माश्यांच्या भाजीत भुसेंच्या आवाहनाप्रमाणे कांदा न वापरल्यास दोघांचाही सन्मान राखला जाईल.

मंत्री दादा भुसे म्हणतायत की दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं? आणि दुसरे मंत्री विजयकुमार गावित म्हणतायत की मासे खाल्ल्यांवर कुणीही पटू शकतं. म्हणजे एक मंत्री कांदे न खाताही राहता येईल, असं म्हणतायत, आणि दुसरे मंत्री मासे खाल्ल्यानं चेहरा चिकना होऊन कुणीही पटवून घेईल, असा सल्ला देतायत. योगायोगानं दादा भुसे याआधी महाराष्ट्राचे कृषीमंत्री राहिले आहेत, आणि माश्यांमुळे चेहरा चिकना होऊन कुणीही पटवून घेणार, डोळे चांगले राहणार, असं म्हणणारे विजयकुमार गावित वैद्यकीय शिक्षणमंत्री राहिले आहेत.

गावितांच्या विधानावर रंजक प्रतिक्रियाही

आता हे दोन्ही नेते सत्ताधारी आहेत. दादा भुसे शिंदे गटाचे तर विजयकुमार गावित भाजपचे मंत्री आहेत. त्यामुळे गावितांच्या विधानावर उमटलेल्या प्रतिक्रियाही रंजक आहेत. गावितांनी ऐश्रवर्या रायबद्दल केलेल्या विधानावर भाजपच्या चित्रा वाघांनी त्या विधानाचा आधी मतितार्थ सांगितला. नंतर अशी विधानं न करण्याचा सल्लाही दिला. मात्र जेव्हा गुलाबराव पाटील विरोधात होते, तेव्हा त्यांच्या हेमामालिनीच्या विधानावर चित्रा वाघांनी थेट राजीनाम्याची मागणी केली होती.

आता राहिला कांद्याचा विषय. मुळात शेतकरी निर्यातशुल्कामुळे कांद्याचा भाव पडण्याची भीती वर्तवतायत. तर मंत्री दादा भुसे कांदा महागला तर लोकांना तो न खाण्याचा सल्ला देतायत. मात्र डोसा विकणारे, भजी विकणारे, पाणीपुरी-भेळविक्रेते, वडापाव विकणारे, हॉटेल व्यावसायिक यांचं तर कांद्यावाचून भागणार नाही.

ज्यांना एक मोठा वर्ग संत मानतो, त्यांच्यातही कांदा-लसूणच्या उत्पत्तीवर वाद आहेत. कांदा ही एक छोटी अर्थव्यवस्था आहे. त्यावर लाखो लोकांचं पोट आहे. कांद्याची निर्यात ही भारताच्या अर्थव्यवस्थेत चांगला हातभारही लावते. मात्र हे या लोकांच्या ध्यानी-मनीच नाहीय.

भारती पवार यांची एकाचवेळी दोन वक्तव्ये

दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार एकाचवेळी दोन वक्तव्ये करतायत. आधी म्हटल्या कांद्यावर निर्यात शुल्काचा निर्णय शेतकरीहिताचा आहे, आणि नंतर लोकांच्या मागणीप्रमाणे निर्यातशुल्कासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेईल, असंही त्या म्हणतायत. जर कांद्यावरचं निर्यातशुल्क शेतकरीहिताचं असेल तर कांद्याचे भाव कवडीमोल होणार नाहीत, याची तुम्ही हमी देणार का? याप्रश्नावर थेट उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.

एकीकडे निर्यातशुल्काविरोधात कांदा बाजार समित्या बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर दुसरीकडे एक मंत्री कांदा न खाल्ल्यास काय बिघडणार? असा प्रश्न करतायत. दुसरे मंत्री मास्यांमुळे चेहरा चिकना होऊन कुणीही पटवून घेऊ शकतं, असं सांगतायत. मात्र गावितांनी सुचवलेल्या माश्यांच्या भाजीत आता भुसेंच्या आवाहनाप्रमाणे जर कांदे टाकले नाही, तर चालेल का? याबद्दल आता कोणते नेते बोलणार, याची प्रतीक्षा आहे.