मुंबई | शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा प्रकाश सुर्वे यांच्यासोबतचा मॉर्फ व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकारण एकच तापलंय. या व्हीडिओ मागे ठाकरे गटाचा हात असल्याचा म्हात्रे यांनी आरोप केलाय. तर आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवायची म्हणजे बेशरमपणा आहे, असं म्हणत ठाकरे गटाकडून शीतल म्हात्रे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या व्हायरल व्हीडिओवरुन शीतल म्हात्रे समर्थक आणि शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच संतप्त झालेत. या कार्यकर्त्यांनी संशयिताला काळ फासलं. दरम्यान आता या प्रकरणावर आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
असे व्हीडिओ मॉर्फ कसे होऊ शकतात आणि नक्की काय झालं, हे देखील महत्त्वाचं आहे. कारण असे व्हीडिओ मॉर्फ होऊ लागले तर ते सर्वांसाठीच धोक्याचं आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. गोरेगावमध्ये शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेनंतर त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.
या व्हायरल व्हीडिओवरुन शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केलाय. हा व्हीडिओ व्हायरल करा, असे आदेश मातोश्रीवरुन आल्याचा गंभीर आरोप शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतून केला. शीतल म्हात्रे यावेळस संतप्त झालेल्या दिसून आल्या. म्हात्रे यांनी केलेल्या या आरोपाला काही मिनिटांमध्येच ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आलं.
शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपांवरुन ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणं म्हणजे बेशरमपणा आहे” अशा शब्दात चतुर्वेदी यांनी म्हात्रे यांच्यावर टीका केली आहे.
“त्यांना वाटतं की आमच्याकडे काही उद्योग नाही. ज्यांनी स्वत:च नाव बदनाम केलंय. ज्यांनी 50 खोके खाऊन काम करतायेत, आम्ही त्यांच्यासाठी व्हीडिओ बनवणार?”, असा सवाल चतु्र्वेदी यांनी उपस्थित केलाय.
“आम्हाला स्वत:ची कामं आहेत. आमची कामं जनतेशी संबंधित आहेत. जनतेशी कामाशी आमची बांधिलकी आहे. तसेच जर असा व्हीडिओ व्हायरल झाला असेल, तर त्यासाठी सायबर सेल आहे. सायबर सेल त्यांची जबाबदारील पार पाडेल. पण आरोप करणं, राजकारण करणं, तसेच प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांवर आरोप करणं हा बेशरमपणा आहे”, असं चतुर्वेदी म्हणाल्या.
दहिसरमध्ये शनिवारी 11 मार्च रोजी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रॅलीसाठी आले होते. भूमिपूजन, उद्घाटन, रॅली आणि भाषण पार पडलं. एकूण 4.30 तास हा कार्यक्रम होता. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे या रॅलीत सहभागी झाले होते. व्हीडिओ काढणाऱ्यांनी आपल्या सोयीच्या अँगलने व्हीडिओ काढला आणि एडीट केला. यावरुन सर्व राजकारण पेटलंय.