महिला आमदाराची अरेरावी, अभियंत्याच्या थेट कानशिलात लगावली

| Updated on: Jun 21, 2023 | 9:36 AM

आमदार गीता जैन यांनी महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यामुळे गीता जैन या संबंधित अभियंत्यांवर संतापल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत असताना संतापात मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

महिला आमदाराची अरेरावी, अभियंत्याच्या थेट कानशिलात लगावली
Follow us on

मुंबई : अपक्ष आमदार गीता जैन यांनी महापालिका अभियंत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनधिकृत बांधकामावरची तोडक कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी अरेरावी केली आहे. गीता जैन या मीरा भाईंदरमधील सरकार समर्थक आमदार आहेत. अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला विरोध करताना त्यांनी अभियंत्यांसोबत वाद घातला. तसेच त्यांनी एका अभियंत्याला मारहाण केल्याचं देखील व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. गीता जैन यांनी संबंधित घटनेवर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.

“जून महिन्यात कुठलंही कायदेशीर किंवा बैकायदेशीर घर तोडायचं नाही, असा जीआर आहे. पावसाळ्यात तुम्ही अनधिकृत घरदेखील तोडू शकत नाहीत. पण त्यांनी ते घर तोडलं. मी अभियंत्याला बोलावलं आणि घर का तोडलं, संबंधित व्यक्ती स्वत: घर तोडायला कबूल झालेली. असं असताना तुम्ही ते घर का तोडलं? असा प्रश्न विचारला”, असं गीता जैन म्हणाल्या.

‘…म्हणून हात उचलला’

“तिथे घराची महिला रडून सगळं सांगत होती. त्यावेळी एक अभियंता हसत होता. महिलेचा किती अपमान करायचा? एका महिलेचं घर जातंय. ती रडतेय. तर हा अभियंता हसतोय? मला त्याचा राग आला. त्यामुळे संतापून माझा हात सुटला. मी बोलून मार्ग काढणार होते. पण हे हसत होते. दुसऱ्याचं घर तुटतं तेव्हा हसायचं असतं का?”, असा सवाल गीता जैन यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“ते कुणाचीतरी सुपारी घेऊन आले होते. ती जागा बिल्डरची जागा आहे. त्यांना तिथे असलेले अनधिकृत गाळे दिसत नाहीत का? त्यांना अनधिकृत बार आणि हॉटेल्स दिसत नाहीत का?”, असे प्रश्न गीता जैन यांनी उपस्थित केले.

‘माझ्याविरोधात तक्रार झाली तर…’

“माझ्याविरोधात तक्रार झाली तर मी झेलायला तयार आहे. पण महिलेचा अपमान मी जराही सहन करु शकणार नाही. मी सुद्धा महिला आहे. मला याचं कोणतंही दु:ख वाटत नाही”, असं गीता जैन म्हणाल्या.

“एकाच घरावर ही कारवाई झाली. खरंतर ते घर अधिकृत होतं. पण त्या घरला वाढवण्यात आलं होतं. घरमालकाने आपली चूक मान्य केली होती. घरमालक वाढवलेली जागा काढणार होता. त्याने ते काम सुरुदेखील केलेलं. पण बिल्डराची सुपारी घेऊन हे प्रकार करायचे आणि पूर्ण घर हलवून टाकायचं. अधिकृत घरालाही नुकसान झालंय. पावसाळ्यात घरातील चार महिला, पाच मुलं जाणार कुठे?”, असा प्रश्न गीता जैन यांनी उपस्थित केला.