मुंबई | 3 मार्च 2024 : जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीला सोडून एनडीएचा हात हाती घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नीतीश कुमार यांच्या या निर्णयाने इंडिया आघाडी कमकुवतही झाली आहे. मात्र, नीतीश कुमार यांच्या आघाडी सोडण्याने केवळ इंडिया आघातील नेतेच नाराज झालेले नाहीत तर जेडीयूचे नेतेही नाराज झाले आहेत. नीतीश कुमार यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्र जेडीयूमध्ये पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला रामराम करणार असून नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे.
आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आहेत. मात्र, नीतीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर कपिल पाटील नाराज आहेत. पुरोगामी शक्तींनी भाजपसोबत जायला नकोय, असं त्याचं मत आहे. त्यामुळेच त्यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील आज नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कपिल पाटील यांनी आज धारावीत एका सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच कपिल पाटील नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. कपिल पाटील यांच्या या निर्णयामुळे राज्यातील जेडीयूचं अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कपिल पाटील नवीन राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. तसेच इंडिया आघाडीसोबतच आपण राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
कपिल पाटील यांनी काल या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. रविवारी एक सभा आयोजित केली आहे. नीतीश कुमार यांनी भूमिका बदलली. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. स्वतः शरद पवार साहेबांनी देखील मला भेटायला बोलवलं होतं. नीतीश कुमार हे भाजपसोबत गेले असले तरी आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबतच आहोत. आमच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. धारावीत आम्ही मोठी सभा घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. या सभेला उद्धव ठाकरेही उपस्थित असतील. जे भाजपविरोधक आहेत, ते आम्हाला पाठिंबा देतील, असं कपिल पाटील यांनी स्पष्ट केलं.