महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीने 1 उमेदवार जास्त दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. महायुतीने 1 उमेदवार जास्त दिल्याने या निवडणुकीत चुरस आणि सस्पेन्स वाढला आहे. महायुतीकडून एकूण 9 उमेदवार देण्यात आले आहेत. पण महायुतीचं संख्याबळ पाहता त्यांचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. पण 9 व्या उमेदवारासाठी महायुतीला अनेक मतांची आवश्यकता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून प्रत्येकी एक उमेदवार देण्यात आले आहेत. या तीनही पक्षांच्या संख्याबळानुसार प्रत्येकी एक उमेदवार सहज जिंकून येण्याची शक्यता आहे. पण या निवडणुकीत दगाफटका झाला तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आता सर्वच पक्षांकडून काळजी घेतली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी आता सगळेच पक्ष कामाला लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट वगळता इतर सर्व पक्ष आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आणि ठाकरे गट आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात बैठक पार पडली आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह मंत्री रविंद्र चव्हाण हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे या घडामोडी सुरु असताना विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. भाजप सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणूक आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील सर्व आमदारांची आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची महिला आर्थिक विकास महामंडळच्या सभागृहात बैठक पार पडली आहे. या बैठकीत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती समोर येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे दोन उमेदवार देण्यात आले आहेत आणि कोणताही दगाफटका या निवडणुकीत होता कामा नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी करण्यात येत आहे. तसेच अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना घराघरापर्यंत पोहोचव्यात यासाठी देखील नेत्यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत शरद पवार गटाकडून शेकाप नेते जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे ते जिंकून यावेत यासाठी हितेंद्र ठाकूर यांना मतदानासाठी आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे 3 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे 3 मतं शरद पवार गटासाठी महत्त्वाची आहेत.