पुणे : कसबापेठ पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे. तब्बल 28 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला आहे. या 28 वर्षात भाजपला ठाकरे गटाची साथ होती. पहिल्यांदाच ठाकरे गटाने साथ सोडली आणि भाजपला मतदारसंघही गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे मनसेचा पाठिंबा आणि शिंदे गटाची साथ असूनही भाजपला धोबीपछाड व्हावं लागलं आहे. या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता. मनसेचा पाठिंबा म्हणजे भाजप आणि मनसेच्या युतीची ही लिटमस टेस्ट होती. मात्र, ही लिटमस टेस्टच फेल गेली आहे. त्यामुळे भाजपसमोरचं टेन्शन वाढलं आहे. महाविकास आघाडीने अशीच एकजूट दाखवल्यास भाजपच्या मिशन 145 लाच सुरुंग लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर उभे होते. तर भाजपकडून हेमंत रासने उभे होते. या निवडणुकीत धंगेकर यांना 73309 मते मिळाली. तर रासने यांना 62394 मते मिळाली. म्हणजे धंगेकर यांनी रासने यांचा 10,915 मतांनी पराभव केला.
या निवडणुकीत हिंदू महासंघाचे आनंद दवे उभे होते. त्यामुळे हिंदूंची आणि खासकरून नाराज ब्राह्मणांची मते दवे यांना मिळतील अशी शक्यता होती. मात्र, दवे यांना फारशी मते मिळाली नाहीत. दवे यांना फक्त 297 मते मिळाली. त्यामुळे हिंदू मतांमध्ये फूट पडल्याने आमचा पराभव झाला असं सांगण्याची सोयही भाजपला राहिली नाही. या निवडणुकीत टिळक कुटुंबाला तिकीट देण्यात आलं नव्हतं. भाजपने टिळक कुटुंबाला डावलल्याने येथील ब्राह्मण समाज नाराज झाला होता. आम्ही नोटाला मतदान करणार असल्याचं ब्राह्ममणांनी म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. नोटाला अवघे 1401 मते पडली आहेत. त्यामुळे भाजपला नोटावरही पराभवाचे खापर फोडता येत नाहीये.
1. अजय शिंदे (मनसे) – 8284
2. अरविंद शिंदे (काँग्रेस) – 47296
3. मुक्ता शैलेश टिळक (भाजप) – 75492
4. तोसिफ अब्बास शेख (संभाजी ब्रिगेड) – 594
5. अल्ताफ करिम शेख (अपक्ष) – 196
6. धनावडे विशाल गोरख (अपक्ष) -13989
7. नवनाथ गेनुभाऊ रणदिवे (अपक्ष) – 161
8. नाईक स्वप्नील अरूण (अपक्ष) -146
9. युवराज भुजबळ (अपक्ष) – 1072
10. राजेश सिसराम जान्नू (अपक्ष) -307
11. नोटा – 2528
एकुण मतदान 150069
गेल्याववेळी मुक्ता टिळक यांना कसब्यातून 75492 मते पडली होती. यावेळी भाजपच्या रासने यांना फक्त 62394 मते मिळाली आहेत. मागच्यावेळी मुक्ता टिळक या 13,098 मते घेऊन विजयी झाल्या होत्या. याचाच अर्थ यावेळी भाजपची 13 हजार मते कमी झाली आहेत. मागच्यावेळी एकसंघ शिवसेना आणि भाजपची युती होती. यावेळी ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत असल्याने भाजपची मते कमी झाली असं म्हणता येईल. पण शिंदे गट आणि मनसेचा पाठिंबा असूनही भाजपची मते का वाढली नाही? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
मनसेने परप्रांतियाचा मुद्दा स्पष्ट करावा तरच त्यांच्याशी युती होईल असं भाजपकडून वारंवार सांगितलं जात होतं. पण राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आणि कसब्यातील पराभव समोर दिसू लागल्यानंतर भाजपने मनसेचा स्वत:हून पाठिंबा मागितला. मनसेने पाठिंबा दिला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी कामही केलं. तरीही भाजपचा पराभव झाला.
मागच्यावेळी या मतदारसंघात मनसेला 8284 मते मिळाली होती. तरीही भाजपला मनसेचा फारसा फायदा झाला नाही. कसब्यातील मनसेचा भाजपला पाठिंबा म्हणजे ही दोन्ही पक्षाच्या युतीची लिटमस टेस्ट होती. या निवडणुकीत भाजपला यश मिळालं असतं तर मनसेला सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असत्या. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या निवडणुकीत भाजपसोबत शिंदे गट होता. पण शिंदे यांच्या गटाची अजून संघटन बांधणी झालेली नाही. त्यामुळे शिंदे गटाचा संपूर्ण राज्यात असा प्रभाव नाही. तेच चित्र पुण्यात दिसलं. शिंदे गटाचा कसब्यात भाजपला फारसा फायदा झाला नसल्याचं दिसून आलं आहे. फायदा झाला असता तर भाजपच्या मतांची टक्केवारीही वाढली असती. तसेच राज्यात सत्ता असूनही भाजपला कसब्यातून पराभूत व्हावं लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.