लोकसभेलाच पाठिंबा देतेवेळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जागावाटपावरुन टीका केली होती. मात्र लोकसभेनंतर विधानसभेत दगाफटका झाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा मनसे नेते देत होते. 2009 ला राज ठाकरेंनी विधानसभेत 143 उमेदवार उभे केले, पहिल्याच दमात 13 आमदार जिंकले. त्यांनी 5.71 टक्के मतं मिळवली होती. त्यांच्या पक्षाने 2014 ला 219 उमेदवार उभे केले. पण एकच आमदार जिंकला. त्यावेळी त्यांनी 3.15 टक्के मतं घेतली. 2019 ला 101 उमेदवार उतरवले. त्यावेळीही एकच आमदार निवडून आला. मतदानाची टक्केवारी घटून 2.25 टक्क्यांवर आली. यंदा 2024 ला मनसे 200 ते 250 जागांवर स्वबळावर तयारी करत असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणूक बघितल्यास मनसेनं 2009 ला 11 लोकसभांवर उमेदवार उभे केले. या निवडणुकीत त्यांनी 4.1 टक्के मतं घेतली. 2014 ला 10 उमेदवार उभे केले. ती टक्केवारी घसरुन दीड पर्यंत आली. 2019 ला मनसे लोकसभा लढली नाही. पण राज ठाकरेंनी भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा इतरांना मतदानाचं आवाहन केलं. 2024 ला देखील मनसे लोकसभेत उतरली नाही. यावेळी राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात भाजपला मतदानाचं आवाहन केलं.
दरम्यान, झळकलेल्या बॅनर्समुळे वरळी विधानसभेत मनसेकडून संदीप देशपांडे लढणार असल्याची चर्चा आहे. तसं झालं तर देशपांडेंविरोधात आदित्य ठाकरेंमध्ये सामना रंगू शकतो. 2019 ला आदित्य ठाकरेंनी वरळीतून राष्ट्रवादीच्या सुरेश मानेंविरोधात निवडणूक लढवली होती. ७० हजारांहून जास्तीच्या फरकानं आदित्य ठाकरे जिंकले होते. तर 2019 ला मनसेचे संदीप देशपांडे माहिममधून अखंड शिवसेनेच्या सदा सरवणकरांविरोधात लढले. देशपांडेंचा 18 हजार 647 मतांनी पराभव झाला होता.