मुनव्वर फारुकीकडून कोकणी माणसाचा उल्लेख करत शिवी, मनसे अ‍ॅक्शन मोडमध्ये, सोशल मीडियावरही संताप

| Updated on: Aug 12, 2024 | 10:01 PM

मुनव्वर फारुकीकडून कोकणी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही आता व्हायरल झाला आहे. मुनव्वरच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. तसेच मनसे, भाजप आणि शिवसेना नेत्यांनी मुनव्वरवर सडकून टीका केली आहे.

मुनव्वर फारुकीकडून कोकणी माणसाचा उल्लेख करत शिवी, मनसे अ‍ॅक्शन मोडमध्ये, सोशल मीडियावरही संताप
मुनव्वर फारुकीकडून कोकणी माणसाचा उल्लेख करत शिवी
Follow us on

बिग बॉस हिंदी सीझन 17 चा विजेता आणि स्टँडअप कोमेडियन मुनव्वर फारुकी हा पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुनव्वर फारुकीने यावेळी आपल्या स्टॅंडअप कॉमेडीच्या कार्यक्रमात कोकणी माणसाबद्दल बोलताना अपशब्दाचा प्रयोग केल्यामुळे तो आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मनसेकडून मुनव्वर फारुकीच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनीदेखील मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे मुनव्वरला जो तुडवेल त्याला एक लांखाचे बक्षीस, असं समाधान सरवणकर म्हणाले आहेत. तर या मुनव्वरला लवकरच मनसेचा दणका बसेल, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृतकडून फेसबुकवर करण्यात आली आहे.

“मुनव्वरने कोकणी माणसांची माफी मागितली नाही तर या पाकिस्थानप्रेमी मुनव्वरला जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार. कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजू दे. याला जो तुडवेल त्याला एक लाखांचे बक्षीस. येवो कोकण आपलंच असा, असे म्हणून स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल हे उपरे ही भाषा बोलतात”, अशा तिखट शब्दांत समाधान सरवणकर यांनी निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांचादेखील निशाणा

दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील अतिशय तिखट शब्दांत मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. “हा कोण मुनव्वर फारुकी नावाचा हिरवा साप, त्याची जीभ चांगलीच वळवळायला लागली आहे. त्याला आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये कोकणातील लोकांबद्दल टिंगल उतरण्याची जास्तच खाज असेल तर त्याचा घरचा पत्ता आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्याला लवकरच मालवणी हिस्का दाखवावा लागेल की, तो त्याची स्टँडअप कॉमेडी मालवणीत करायला लागेल. कोकणी माणासाची अशी टिंगल करत असशील तर तुझ्यासारख्या हिरव्या सापांना पाकिस्तानात पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

मुनव्वर नेमकं काय म्हणाला?

मुनव्वर फारुकी स्टँडअप कॉमेडी करत असताना तो प्रेक्षकांना “मुंबईतून सर्वजण आले आहेत ना?”, असं विचारतो. “कुणी लांबून प्रवास करुन आलं नाही ना?”, असं विचारतो. यावेळी प्रेक्षकांमधील एकजण आपण तळोजा येथून आल्याचं सांगतो. त्यावर मुन्नवर बोलतो, “अच्छा आज विचारलं प्रवास करुन आलात का? तर तळोजा म्हणून सांगत आहात. तळोजा मुंबईपासून वेगळा झाला. पण यांचे गाववाले जेव्हा यांना विचारतात की, कुठे राहतात? तर मुंबईत राहतात असं सांगतात. हे कोकणी लोकं सर्वांना चु** बनवतात”, असं वादग्रस्त वक्तव्य मुनव्वर फारुकी करतो. मुन्नवरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.