नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 14 जानेवारी 2024 : शास्त्रज्ञांनी एवढे चमत्कार केले पण त्यांचे होर्डिंग कधी लागले? आपल्याकडे कोणताही शोध न लावता होर्डिंग्ज लावले जातात. फार फार मुलांचा शोध आपल्याकडे लावला. मुलांचा शोध लावणे या पलिकडे कोणताही शोध न लावता… आपल्याकडे होर्डिंगवर फोटो असतात.. आज मुन्नाचा वाढदिवस. कोण मुन्ना? मुलं काढण्यापलिकडे कोणता शोध लावला?, अशी मिश्किल टोलेबाजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. भायखळ्यात विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मुलांमधील जिज्ञासा ओळखून त्याच्या कलागुणांना वाव द्या, असं आवाहनही केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी होर्डिंगबाजांवर शेलक्या भाषेत टीका केली. आपल्याकडे आपण सर्रास होर्डिंग्ज लावतो. कोणताही शोध न लावता मिरवून घेतो. पण एकाही शास्त्रज्ञाचं तुम्ही होर्डिंग पाहिलंय? याचा शोध मी लावला…. त्याचा शोध मी लावला… ही गोष्ट मी केली… यातून ही गोष्ट शोधून काढली… असं होर्डिंग कधी पाहिलंय? हे शास्त्रज्ञ शोध लावतात आमि नामानिराळे असतात. जगाला दोन्ही हाताने भरभरून देत असतात. अनेकांचे त्यात प्राणही गेले आहेत, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
आपल्याकडे विज्ञान म्हटलं की रॉकेट सुटतं. रॉकेट नाही अनेक गोष्टींचे शोध असतात. तेलाच्या शोधापासून अनेक गोष्टींचे शोध असतात. चाक कसं चालतं? एक एकाला काय काय सूचत गेलं आणि आपल्या हातात काय पदरात पडलं याचं भान ठेवून आपण शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजे. शास्त्रज्ञांचा आदर राखला पाहिजे. त्यांनी जे निर्माण करून ठेवलं त्याची कल्पना करता येणार नाही. आजूबाजूला नजर टाकली तरी शोध म्हणजे काय हे कळतं. आज अनेक जण मोबाईल फोनवरून माझं भाषण रेकॉर्ड करत आहेत. त्यांचा शोध कुणी लावला माहीत आहे काय? टेलिफोनचा शोध, दिव्याचा शोध कुणी लावला माहीत आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी केली.
शोध कसा लागला? त्यामागचं शास्त्र काय आहे? हे माहीत आहे काय? अनेक शास्त्रज्ञांनी इतके चमत्कार घडवले ही थक्क करणारी गोष्ट आहे, असं सांगतानाच विज्ञानातील शोध इच्छा किंवा गरजेतून लागले आहेत. गरज ही शोधाची जननी आहे, असं आपण म्हणतो ना, असंही त्यांनी सांगितलं.
माझ्या शाळेतील मार्क पाहता मला इथे बोलावल याच मला आश्चर्य वाटलं. मी शाळेत असताना विज्ञानाचे कोणते विषय कशासाठी असतात याचा मला प्रश्न पडायचा. भौतिक शास्त्र आणि रसायन शास्ज्ञाचं काय करायचं असा प्रश्न पडायचा. विज्ञान आणि शास्त्र ही कल्पनेपलिकडची गोष्ट आहे. मी शाळेपासून ज्ञानाचा भूखा होतो पण विज्ञानाचा नव्हतो, असं त्यांनी सांगितलं.
ठरावीक संपादक असतात, ठरावीक राजकीय नेते असतात ते सकाळपासून बोलत असतात. कॅमेरा समोर आला तर ते बोलत असतात. त्यांना वाटतं त्यांना जगातलं सगळं कळत असतं. पण त्यांना काहीच कळत नसतं, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.