मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : मुंबई हायकोर्टाने फटाक्यांबाबत महत्त्वाचा निर्णय दिलाय. मुंबईत दिवाळीत फक्त रात्री 8 ते 10 वाजेच्या सुमारास फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली होती. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने हा निर्णय दिला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टाच्या फटाक्यांच्या निर्देशांवर भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवर ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबई हायकोर्टाने मराठी पाट्यांबाबत दिलेल्या आदेशावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“न्यायालयं आदेश देतात पण त्यांचं खरंच काटेकोर पालन होतं का? दुकानांवर मराठी पाट्या लावायचा न्यायालयाचा आदेश का पाळला जात नाही आहे?”, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. “म्हणे फटाके फोडायचे नाही. आम्ही सण कसे साजरे करायचे हे पण आता कोर्ट ठरणार, आणि कोर्टाने दिलेले दुकानांवर मराठी पाट्यांचे आदेश कुणी पाळत नाही. त्यावर कुणी लक्ष देणार नाही. हा कोणता न्याय?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.