मुंबई | 18 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. राज ठाकरे, त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासह सचिन मोरे, हर्षल देशपांडे आणि राज ठाकरे यांचे मित्र हे चार्टड विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या चार दिवसांमधील राज ठाकरे यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे. राज ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय.
मनसे आणि भाजप युतीला वेग आला आहे. राज ठाकरे आज दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्याला निघाले आहेत. दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरु आहेत. या संदर्भातील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बातचित होऊ शकते. ही बातचित सकारात्मक ठरली तर मनसेला लोकसभेसाठी किती जागा सोडण्यात येतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पक्षासाठी महायुतीकडून दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना मनसेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी याआधीच आपण यापुढे सत्तेत असू असे संकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर सातत्याने राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या कार्यक्रमात मुलाखत दिली होती. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या मनसे पक्षासोबत युतीचे संकेत दिले होते. मनसेसोबत आमचे सूर जुळत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे मनसे-भाजप युतीसाठी जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांच्या अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा होते आणि महायुतीबाबत नेमका काय निर्णय होतो? याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनातही उत्सुकता आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे.