निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यात चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपने नो रिस्कचं धोरण अवलंबलं आहे. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. शेलार राज यांच्याकडे युतीचा निरोप घेऊन आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज यांच्या या प्रतिक्रियेनंतर मनसे आणि भाजपची युती होणार की नाही? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना तुम्ही एनडीएसोबत जाणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. आजचा विषय वेगळा आहे. वेगळ्या कारणासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. जेव्हा निवडणुकीचा विषय येईल, तेव्हा त्यावर बोलेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या या विधानाने ते भाजपसोबत जाण्याच्या चर्चांचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
आज सकाळी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात लोकसभा निवडणुकीचं धुमशान रंगलेलं असतानाच शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांना सोबत घ्यायचं भाजपचं ठरलं आहे. दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्यानेच आशिष शेलार राज यांच्याकडे निरोप घेऊन आल्याची जोरदार चर्चा रंगली. भाजपने लोकसभा निवडणुकीत नो रिस्क धोरण अवलंबलं आहे. अजित पवार सोबत येऊनही राज्यात भाजपला फारसं यश मिळताना दिसत नाही. त्यामुळेच राज ठाकरे यांना सोबत घेण्याचं भाजपमध्ये घटत असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी कोणतंही थेट भाष्य न केल्याने युतीबाबतचं गुढ अधिकच वाढलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग, मुंबई पालिका आणि राज्य सरकारने मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हजर न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. त्यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुका काय अचानक आल्या आहेत का? दर पाच वर्षांनी निवडणुका येत असतात. तेव्हा निवडणूक आयोग तयारी का करत नाही? पाच वर्ष आयोग काय झोपा काढतो का? असा सवाल करतानाच निवडणूक आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई का करू नये? निवडणूक आयोगावरच कडक कारवाई का करू नये? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.