मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आपली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूमिका जाहीर केली. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच आपण महायुतीला पाठिंबा जाहीर करत असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. “मी ज्या घरात जन्मलो. त्या घरात शिवसेनेचा जन्म झाला. मी पहिल्यापासून जे पाहत आलो. बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. लहानपणापासून त्यांच्यासोबत फिरलो. अनेक सभांना गेलो. माझ्या आयुष्यातील एकमेव पक्ष शिवसेना होता. १९८४ साली थोड्या काळासाठी असेल. १९९८च्या आसपास भाजप आणि शिवसेनेची युती झाली. ती युती झाल्यावर शिवसेनेबरोबर माझे कुणाबरोबर माझे संबंध आले असतील तर भाजपसोबत. गडकरी,महाजन आणि मुंडेंसोबत संबंध होते. राजकारणाच्या पलिकडे आमचे संबंध होते. माझा संबंध कधी काँग्रेसवाल्यांशी कधी आला नाही. भेटी होत होत्या. पुलंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांशी भेटी होत्या, पण गाठी पडल्या त्या भाजपसोबत. त्यामुळे अनेकवेळा त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध प्रस्थापित झाले”, असं राज ठाकरे म्हणाले.
“महाजन गेले. त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावर गेलो. मोदींसोबत संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरात पाहिला. त्यावेळी गुजरातच्या विकासाची चर्चा होती. मी ते पाहत होतो. मी महाराष्ट्रात आलो तेव्हा कसं वाटलं गुजरात असं मला पत्रकारांनी विचारलं. मी म्हटलं गुजरात डेव्हल्प होतंय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे. जसजसे आमचे संबंध प्रस्थापित व्हायला लागले. त्यावेळी मोदी पंतप्रधान व्हावेत असं बोलणारा मी एकमेव होता. त्यांच्या पक्षाचेही लोकं बोलत नव्हते. स्वतचा विचार असतो. माणसं बोलत असतात. स्वप्न सत्यात उतरावे असं प्रत्येकाला वाटत असतं. २०१४च्या निवडणुकीनंतर मला वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते पाच वर्षात दिसत नाही. काही तरी वेगळ्या गोष्टी दिसतात”, असं राज ठाकरे म्हणाले.
“नोटबंदी दिसते. बुलेट ट्रेन दिसते. आजच सांगतो ज्या गोष्टी पटल्या नाही त्या नाही पटल्या. उद्या संबंध चांगले झाले तर चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणेल. वाईटला वाईटच म्हणेल. राजीव गांधी नंतर एका व्यक्तीची सत्ता आली. काय काय करेल वाटलं असतं. ज्याच्यावर विश्वास असतो त्याला तडा जातोय असं वाटलं तर तो राग असतो.. माझा राग तर टोकाचा आहे. मी महाराष्ट्रावर प्रेम करतो. मराठी माणसावर प्रेम करतो. भाषेवर प्रेम करतो. टोकाचं प्रेम करतो. एखाद्याचा विश्वास वाटला तर टोकाचा प्रेम करतो. आणि नाही वाटलं तर टोकाचा विरोध करतो. २०१९च्या निवडणुकीत लाव रे तो व्हिडीओ हा टोकाचा विरोध होता. होय टोकाचा विरोध करतो. पण ३७० कलम रद्द केलं तेव्हा त्यांचं अभिनंदन केलं. एनआरसीच्या बाजूने मोर्चा काढला. जी गोष्ट योग्य ती योग्य. अयोग्य ती अयोग्य”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
“या देशाने अमिताभवर प्रेम केल. मीही केलं. पण एक माणूस प्रांताचा विचार करतोय . मला नाही पटलं. मी व्यक्तीगत टीका केली नाही. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत टीका करत आहेत, तशी मी टीका केली नाही. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून टीका केली नाही. भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला. आज टीका करत आहेत. जेव्हा मी टीका करत होतो, तेव्हा राजीनामा देऊन का नाही आला. तेव्हा सत्तेचा मलिदा चाटत होता ना?”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.