महायुतीची आज मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती हे या सभेचं विशेष विशिष्ट्य होतं. या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वाचा उल्लेख केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांचं कौतुक केलं. “पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे मोदीजी… सन्मानिय व्यासपीठ आणि तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…”, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
“मोदी तुम्ही अनेकदा मुंबईत आलात. पण २१ वर्षावर आपण शिवतीर्थावर आलात. मला आठवतंय त्यावेळी तुम्ही कमळातून बाहेर आला होता. आणि २०१४ला आपण कमळ बाहेर काढलं. मी फार वेळ बोलणार नाही. मोदींचं भाषण ऐकायचं आहे. तीन टप्प्यात बोलणार आहे. एक टप्पा झाला आहे. पहिला टप्पा होता. मोदींची पाच वर्ष. त्यावर बोलायचं ते २०१९मध्ये बोलून गेलो. आता गेली पाच वर्ष. मला वाटतं देवेंद्र फडणवीस, अजितदादा शिंदे सर्वांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर वेळ घालवला. जे सत्तेत येणार नाही. त्यांच्याबद्दल का बोलत नाही. काही आवश्यकता नाहीये त्यांची. अनेक योजना आहेत. ज्या पाच वर्षात झाल्या नाहीत. मी सभेत म्हटलं टिकेच्यावेळी टीका प्रशंसेच्या वेळी प्रशंसा”, असं राज ठाकरे म्हणाले.
“९०च्या दशकात आपल्या कारसेवकांना ठार मारलं. मुलायम सरकारने ते केलं. बाबरीचा ढाचा पडला. राम मंदिर कधी होईल असं वाटत होतं. मनात आलं हे मंदिर कधी होणार नाही. मोदींना धन्यवाद देतो. तुम्ही होता म्हणून राम मंदिर होऊ शकलं. नाही तर ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघतो तेव्हा एक गोष्ट कानावर पडायची. ३७० कलम रद्द झालं पाहिजे. इतक्या वर्षात ती गोष्ट झाली नाही. ती मोदींनी केली. काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जागा घेऊ शकता. तो भारताचा भाग आहे हे आता सिद्ध झालं”, असं राज ठाकरे म्हणाले.
“राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा मोठी केस झाली होती. प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं. शहाबानोच्या बाजूने कोर्टाने निकाल लावला. त्यानंतर राजीव गांधींनी बहुमताच्या आधारे निकाल काढून टाकला. त्या बाईला न्याय मिळाला होता. तो काढून टाकला. एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदींनी ती गोष्ट करून दाखवली. त्यांनी ट्रिपल तलाक हा कायदा रद्द केला. देशातील सर्व मुस्लिम महिलांमध्ये समाधानाचे वातावरण झालं. रात्री नवरा आला शुद्धीत आला बेशुद्धीत आहे माहीत नाही. तलाक तलाक बोलला तर करायचं काय पुढे., पण मोदींनी कायदाच रद्द केला. याला धाडसी निर्णय म्हणतात. इतकी वर्ष जी गोष्ट झाली नाही. ती केली ही मोठी गोष्ट आहे. मोदीजी पुढच्या पाच वर्षासाठी मी तुमच्यापाठी उभा आहे. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मला त्या बोलून दाखवायच्या आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.