मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र, पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी

| Updated on: Oct 10, 2024 | 3:28 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र, पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे. रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजित क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखीस जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं आदराने नाव घेतलं जातं. रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात काय म्हणाले?

“ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही,” असं राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.

“काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली. मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले. आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

“भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे”, असं देखील मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे.