मुंबई : “मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये म्हटलं की, मी अतिशय कडवट मराठी आहे. माझा जन्म एका कडवट मराठी घरात आणि हिंदुत्ववादी घरात झालाय. हे कडवट मराठीपण मला घरात बघायला मिळालं, बाळासाहेबांच्या बोलण्यातून ऐकायला मिळालं. त्या बाबतीत हा माणूस आतमध्ये वेगळा आणि बाहेर वेगळा असं नव्हतं”, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. महाराष्ट्राचे दिवंगत नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्ताने विधान भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचा अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
ही गोष्ट आहे 1999 ची. तेव्हाची विधानसभा निवडणूक झाली. काही कारणास्तव शिवसेना-भाजपची युती मुख्यमंत्री पदावर अडत होती. काही घडत नव्हतं. सह्या होत नव्हत्या. जवळपास १५-२० दिवस आमदार खेचणं चालू होतं.
एकेदिवशी दुपारची वेळ होती. तीन-साडेतीन वाजले असतील. मला गाड्यांचा आवाज आला. नंतर दोन गाड्या घरासमोर लागल्या. त्या दोन गाड्यांमधून प्रकाश जावडेकर आणि भाजप आणि शिवसेनेचे अजून दोन-चार जण गाडीतून बाहेर आले.
मला म्हणाले, राजसाहेब बाळासाहेबांना भेटायच आहे. मी म्हटलं, अहो ते आता झोपले आहेत. इथे सगळं बाहेर सरकार बनवणं चालू आहे. मी म्हटलं आता ही त्यांची झोपायची वेळ आहे. ते काही उठणार नाही. नाही पण त्यांची भेट घेणं आवश्यक आहे म्हणे.
आज आपलं सरकार बसतंय, त्यामुळे आता बाळासाहेबांना भेटणं गरजेचं आहे. मी म्हटलं अहो ते आज काही भेटणार नाहीत. मग एक निरोप द्याल का म्हणे त्यांना? मी म्हटलं हो. निरोप देतो.
त्यांनी मला सांगितलं की, आता आमचं दोघांचं ठरलं आहे की, सुरेश दादा जैन हे युतीचे मुख्यमंत्री असतील. सगळ्याचं ठरलं आहे की, ते आमदार खेचून आणतील. मग आपलं सरकार बसतंय. फक्त हे बाळासाहेबांच्या कानावर घायलाचं होतं.
वरती गेलो, काळोख होता, शांतता होती. आम्ही अरे-तुरेमध्ये बोलायचो. काका उठ. पण ते उठेनात. मी जोरात बोललो,ए काका उठ. ते बोलले कायरे? मी म्हटलं, जावडेकर आणि ती सगळी मंडळी आलेली आहे. ते म्हणतात आहे की, सुरेश जैन यांना मुख्यमंत्री आणायचं, ते सगळे आमदारांना खेचून आणतील आणि आपलं सरकार बसेल.
बाळासाहेबांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल दुसरा कुणी बसणार नाही. त्यानंतर ते झोपून गेले. मला त्याचवेळी कळलं की, मराठीसाठी या माणसाने सत्तेला लाथ मारली.