मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षातून दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज अशी हकालपट्टी करण्यात आलेल्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. या दोन्ही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी का केली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मनसेने काही दिवसांपूर्वी पक्षाचे कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांचीदेखील हकालपट्टी केली होती. महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर महेश जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यावेळी मनसेच्या दोन गटांमधील वाद थेट रस्त्यावरही आलेला बघायला मिळाला होता. त्यानंतर आता मनसे अध्यक्षांच्या आदेशानुसार आणखी दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. “राज ठाकरे यांच्या आदेशानुसार परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध असणार नाही, ह्याची तमाम महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी”, असं शिरीष सावंत म्हणाले आहेत. शिरीष सावंत यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांची पक्षातून का हकालपट्टी करण्यात आली? याबाबत स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
देशात आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षात वेगवेगळी चाचपणी केली जात आहे. मनसे पक्षातही जोरदार हालचाली सुरु आहेत. मनसे लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची दाट शक्यता आहे. असं असलं तरी दुसरीकडे मनसे महायुतीत सहभागी होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात आवाजात सुरु आहे. या चर्चांना कारण ठरणारी घटना म्हणजे मनसे नेत्यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडलेली आहे. त्यांची भूमिका आणि भाजपची भूमिका हिंदुत्ववादाचीच आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.