सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

| Updated on: Jul 07, 2023 | 4:52 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव गेल्याची चर्चा असताना आता मुंबईत नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज ठाकरे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले आहेत.

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात येतो का? ते पाहणं महत्त्वाचं होतं. असं असताना आज राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पूर्वनियोजित भेट आहे, अशी माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या ताकदवान नेत्या निलम गोऱ्हे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटून एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत ‘या चिमन्यांनो परत फिरा’ असं म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली होती. त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरेंसोबत जाणार का? आणि त्याचं नेतृत्व दोन्ही ठाकरे बंधू करतील का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

भेटीमागचं नेमकं कारण काय?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे हे काही वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटी होत असतात. याआधी एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. तसेच राज ठाकरे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. पण सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असताना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होत आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागचं खरं कारण समोर आलेलं नाही. पण आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीत सध्याच्या राजकीय घडामोडींवरदेखील चर्चा होऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे कदाचित आपली भूमिका स्पष्ट करु शकतात.