राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार, मनसे-भाजप युतीआधी मोठ्या घडामोडी घडणार?

| Updated on: Mar 20, 2024 | 5:47 PM

मनसे आणि भाजप युतीबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी दिल्लीत जावून अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना जास्त उधाण आलंय. आता याचबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार, मनसे-भाजप युतीआधी मोठ्या घडामोडी घडणार?
Follow us on

मुंबई | 20 मार्च 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजप युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती. राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आले. त्यानंतर काल दुपारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना महायुतीबाबत चर्चा करण्यासाठीच राज ठाकरे यांनी अमित शाह यांची दिल्लीत जावून भेट घेतल्याचं स्पष्ट केलं. पण तरीही मनसे आणि भाजप युतीबाबत अधिकृत घोषणा होताना दिसत नाहीय. यामागील महत्त्वाचं कारण आता सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी घडायच्या राहिल्या आहेत. या घडामोडींनंतर कदाचित मनसे-भाजप युतीची घोषणा होऊ शकते किंवा त्याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या भेटीनंतर राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीत सहभागी झाल्यास रणनीती काय असेल? यावर या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मनसे-भाजप युती विधानसभा निवडणुकीत दिसणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीऐवजी मनसे विधानसभा निवडणुकीला महायुतीत एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्यासोबतची बैठक लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होती. पण चर्चा विधानसभा निवडणुकीची झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरीही मनसे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार करणार का? याबाबत साशंकता आहे. राज ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतील. त्यावेळी चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

राज ठाकरे यांच्यासमोर लोकसभा जागेऐवजी राज्यसभेत जागेचा पर्याय दिल्याची शक्यता आहे. किंवा विधानसभेत दोस्तीचा पर्याय देण्यात आल्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. “राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झालेली आहे. आता ओझरतं बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा म्हणजे तुम्हाला नीट सर्व गोष्टी आम्ही सविस्तर सांगू”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.