मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये आज सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मनसेने आतापर्यंत केलेल्या सर्व आंदोलनाची आठवण करुन दिली. राज ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्र सैनिकांनी मेहनत घेऊन आंदोलनं केली. आता टोल नाके बंद झाले म्हणून त्याचं श्रेय आम्हाला देत नाहीत. सत्तेत नसताना देखील अनेक कामं केले. दुकानावरच्या पाट्यांसाठी आंदोलन केले तेव्हा प्रत्येक पाट्यांवर मराठी नाव आली. मोबाईल फोनवर फक्त हिंदी आणि इंग्रजी येत होतं. पण दणका दिल्यानंतर मराठी कानावर ऐकू यायला लागलं, सत्तेत नसताना मनसेने रिझल्ट दिले आहे. मशिदीसमोरच्या भोंग्याचा त्रास अनेकांना होत होता. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. तीन वेगवेगळ्या प्राण्यांचं सरकार होतं. महाराष्ट्राभर आंदोलन केले अनेकांनी स्वतहून बंद केले. माझ्या १७ हजार सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या. २४ तास कुठलेही भोंगे चालणार नाहीत. मंदिरावर असले तरी बंद करावे. सण असेल तर ठीक आहे.’
राज ठाकरे म्हणाले की, ‘एका मुस्लीम पत्रकाराने सांगितले तुम्ही भोंगे बंद केले म्हणून माझा लहान मुलगा आज शांत झोपतोय. पुढच्या २-४ दिवसात माझा जाहीरनामा येईल. कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास होता कामा नये. सण असेल तर समजू शकतो. पण २४ तास चालणार असेल तर कसं चालेल. सोशल मीडियाचा हा काळ आहे. सोशल मीडियावर सगळे बसलेले असतात मोबाईल घेऊन. यामुळे तुमची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाले.’
‘मागे वर्तमानपत्र वाचताना लक्षात आले की, उत्तरप्रदेश आणि बिहारमधून भरतीसाठी मुले आली होती. तेव्हा लक्षात आलं की, महाराष्ट्रात रेल्वेच्या नोकऱ्या होत्या. बाहेरच्या राज्यातून लोकं इथे आली होती. माझ्या राज्यातील मुलांना का नाही कळलं. अशा प्रकारच्या नोकऱ्या आहेत अशी जाहिरात महाराष्ट्रातील वृत्तपत्रात दिली गेली नव्हती. इतके आमदार, खासदार निवडून दिले. अनेक मंत्री झाले. महाराष्ट्रातील एकाही खासदाराला असे वाटले नाही की काहीतरी चुकतंय. यावर एकाने ही आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाही. मग करतात काय हे. तुम्ही निवडून देतात कशासाठी. आंदोलनानंतर मराठीत परीक्षा सुरु झाल्या. हे सत्ता नसताना करुन दाखवलं.’
‘इतर पक्षांना तुम्ही विचारलं नाही. शेतकऱी आत्महत्या करतातच आहे. महिला असुरक्षित आहेत. लहान मुलींवर बलात्कार सुरु झाले. मनसेने हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर जगासमोर आलं. कोणत्या वातावरणात जगताय तुम्ही. कसल्या निवडणुका घेऊन बसलोय आपण. नुसतं उन्हातान्हात उभे राहताय पदरी काही पडत नाहीये. तुमचा स्वाभिमानी कणा मतदानाच्या दिवशी जागृत राहिला पाहिजे. एकदा राज ठाकरेला संधी देऊन बघा. नालायक ठरलो तर परत येणार नाही. दुकान बंद करुन टाकेल. महाराष्ट्राताला जे गत वैभव होतं ते परत मिळवून द्यायचं.’
‘हिंद प्रांतावर पहिल्यांदा मराठ्यांची सत्ता होती. तो हा महाराष्ट्र. कोणीही येतं कोणासोबत ही आघाड्या करतंय. विकले जाताय तुम्ही शांतपणे बघत बसलेत. आताही जे उमेदवार उभे आहेत ते आमच्यातून घेतला आहे. माझी एवढीच विंनती आहे. संधी पुन्हा पुन्हा येत नसते. हा काय पिक्चर नाहीये. ही संधी गेली त्यानंतर पाच वर्षांनी संधी येईल. आयुष्यातील पाच पाच वर्ष निघून जाताय. ज्या प्रकारचा चिखल झालाय. चॅनेलवर शिव्या देताय. असं वातावरण कधीच नव्हतं. परत तेच लोकं आले तर त्यांचा असा समज होईल की ते जे करताय ते बरोबर करताय. तुमच्या मतांचा अपमान झालाय त्याचा बदला घेण्याचीही संधी आहे. येत्या २० तारखेला माझी विनंती आहे. एकदा संधी द्या. नाशिकमध्ये जसं काम केलंय ना आधी झालं होतं ना नंतर झालं. महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडू शकतात. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा इतकीच इच्छा आहे.’ असं ही राज ठाकरे शेवटी म्हणाले.