‘केवळ पैशांसाठी…., यांचे पुरस्कार काढून घ्या’, मनसेचे संयमी नेते बाळा नांदगावकर संतापले?

| Updated on: Dec 24, 2022 | 9:16 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संयमी नेते बाळा नांदगावकर यांनी केंद्र सरकारकडे पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न पुरस्कारांबद्दल महत्त्वाची मागणी केलीय.

केवळ पैशांसाठी...., यांचे पुरस्कार काढून घ्या, मनसेचे संयमी नेते बाळा नांदगावकर संतापले?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संयमी नेते बाळा नांदगावकर यांनी केंद्र सरकारकडे पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न पुरस्कारांबद्दल महत्त्वाची मागणी केलीय. केवळ पैशांसाठी सर्रासपणे पानमसाला, जुगाराच्या अ‍ॅपच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींचे पुरस्कार सरकारने परत घ्यावे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केलीय. तसेच आर्थिक घोटाळ्यात अटक झालेल्या ICICI च्या माजी CEO चंदा कोचर यांनाही दिलेला पद्मभूषण पुरस्कार मागे घ्या, अशी देखील मागणी बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवर केलीय.

“पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न हे कोणतेही साधे पुरस्कार नव्हे तर आपल्या देशाचे सर्वोच्च पुरस्कार आहेत. आर्थिक घोटाळ्यात अटक झालेल्या ICICI च्या माजी CEO चंदा कोचर यांनाही पद्मभूषण देण्यात आला होता. अशा घटनेमुळे या पुरस्कारांचे पावित्र्य कमी होते. त्यामुळे अशा घटनांमध्ये यांचे पुरस्कार सरकारने काढून अशा पुरस्कारांचा मान राखावा”, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

“अनेक सेलिब्रिटी हे केवळ पैशांसाठी सर्रास पणे पानमसाला, अनेक जुगाराचे ॲप यांच्या जाहिराती करतात त्यांच्या बाबतीतही सरकारने पद्म पुरस्कार परत घेण्याचा विचार करावा. इथून पुढेही असे मोठे पुरस्कार देताना विशेष काळजी घ्यावी कारण पद्म पुरस्कार हा देशाचा मान आहे”, असं देखील बाळा नांदगावकर म्हणाले.

मोठमोठ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या सेलिब्रेटींनी पानमसाला आणि जुगाराच्या अ‍ॅपच्या जाहिराती केल्याने त्यांचे पुरस्कार मागे घ्यावे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केल्याने ते तशा जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले आहेत का? अशा चर्चांना आता उधाण आलंय.