मुंबई: मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. मला नवरा बनवण्याचे वचन दिले, असं स्वप्न एके दिवशी पक्षप्रमुखाला पडलं. पण हा शब्द देताना तिथे फक्त उद्धव ठाकरे आणि अमित शाहच होते. सोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. पण असं काही वचनच दिलं नव्हतं असं भाजपनं सांगितलं. त्यामुळे वाद सुरू झाला. टीका सुरू झाली. एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यात आले. त्यावर मी म्हटलं, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो समोर ठेवून दोघांनाही विचारावं नक्की काय झालं. पण त्याच दिवशी बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले. आणि म्हणाले, माझाच मुलगा खोटो बोलतोय, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.
मनसेने घे भरारी हे अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना प्रकाश महाजन बोलत होते. दाढीवाल्याच्या मागे दाढीवाला असला तरच मुख्यमंत्री होता येतं, असंमिश्किल विधानही प्रकाश महाजन यांनी यावेळी केलं. भाजप आणि शिवसेनेचा संसार फार दिवस चालला. कारण दोन्हीकडे मोठी माणसं होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना कधी मातोश्री आणि सेना भवनला येऊ दिले नाही. मात्र तुम्ही एका मुख्यमंत्रीपदासाठी मातोश्री सोडत काँग्रेसकडे जाऊन बैठका घेता? फक्त एका मुख्यमंत्री पदासाठी, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
50 लाखाचे घड्याळ मातोश्रीवर आले तेव्हापासून, राष्ट्रवादी जेव्हा महाराष्ट्रात स्थापन झाली तेव्हापासून सर्व काही बिघडलं आहे. मुंब्र्याच्या औरंगजेबाने सांगितलं औरंगजेब दयाळू होता. ज्या औरंगजेबाने आमच्या राजाचे डोळे काढले त्याचा उदोउदो केला जातो.
अजित पवार संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायला तयार नाहीत. मी म्हटलं, तू धरणात पाणी नसेल तर लघुशंका करू शकतो, तर काहीही करू शकतो. उद्या तू शरद पवारांना काका नाही काकू म्हटला तर आम्ही काय बोलणार? असा हल्लाही त्यांनी चढवला.
ही अंधारे बाई काय आली, शिवसेनेत ज्या सगळ्या उजेडात होत्या, त्या अंधारात गेल्या. मला एक दिवस माझे संपादक मित्र म्हणाले, अंधारेला तूच तोंड देऊ शकतो. मी म्हटलं, या वयात मला कोणत्या बाईच्या तोंडाला लागायला सांगता, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी शिंदे सरकारवरही टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही. काही वर्षांपूर्वी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक होणार होते. त्याचे अजून काही झाले नाही. हे लोक शिवाजी महाराजांना फसवू शकतात, ते तुम्हाला आम्हाला असेच फसवू शकतात, असा हल्ला त्यांनी चढवला.
उद्धव ठाकरे नाराज होऊ नयेत म्हणून मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसवला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे मधल्या काळात मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार झाला, त्याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.