मुंबई: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांच्या निवासस्थानी जाऊन आज त्यांना भेटलो. काल पोलीस आयुक्त संजय पांडेंनाही भेटलो होतो. तसेच ज्वॉईंट कमिश्नर वारकेंना भेटलो. तीनचार दिवसापूर्वी लालबागला माझ्या कार्यालयात मला धमकीचं पत्रं आलं होतं. भोंग्याचा विषय झाल्यापासून आम्हाला धमक्या सुरू आहेत. त्यापैकीच हे एक पत्रं, या पत्रातून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राज ठाकरेंनाही (raj thackeray) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्या संदर्भातच गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितलं. तसेच बाळा नांदगावकरचं जाऊ द्या. पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, असा इशाराही नांदगावकर यांनी दिला. हे पत्रं हिंदीत असून त्यात उर्दूचेही काही शब्द आहे. भोंगे आंदोलनाच्या अनुषंगाने ही धमकी देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बाळा नांदगावकर यांनी आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी दोन तास चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना धमकीचं पत्रं आल्याचं सांगितलं. जीवे मारण्याची धमकी असल्याने मी राज ठाकरेंना ते पत्रं दाखवलं. त्यानंतर पोलीस आयुक्त संजय पांडेंना भेटलो. त्यांना पत्राची प्रत दिली आहे. पोलीस त्यावर काय कारवाई करतील ते पाहू. कुणी पत्रं दिलं आहे हे माहीत नाही. कुणाकडून आलंय याची कल्पना नाही. पण पोस्टाने आलं आहे. माझ्या कार्यालयात आलं. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांशी या बाबत चर्चा केली. ते कारवाई करतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं.
बाळा नांदगावकर ठिक आहे. पण राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरेंसाठी मी वारंवार सेक्युरिटी मागत आहे. त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. पण राज्य सरकारने दखल नाही. राज्य सरकार दखल घेत नसेल तर केंद्र सरकारने दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अजान आणि भोंग्यांच्या अनुषंगाने हे पत्रं आलं आहे. हिंदीतील पत्रं आहे. त्यात काही ऊर्दू शब्दही आहे, असं ते म्हणाले. भोंग्याचा विषय सामाजिक आहे. तो धार्मिक वाटत नाही. महाराष्ट्रातील नाही तर देश परदेशातील लोकांना त्याचा त्रास आहे. हा सामाजिक विषय असल्याचं वारंवार सांगतोय. त्याकडे सरकार पाहिजे तशी दखल घेत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बृजभूषण सिंह यांनी काय बोलायचं ते त्यांनी ठरवावं. आम्हाला काय बोलायचं ते आम्ही ठरवू. आमचे पक्षप्रमुख त्याबाबत निर्णय घेतील, असं सांगतानाच अयोध्येत मनसेचं कार्यालय उघडलं आहे. आता काय बोलणार, असंही ते म्हणाले.