मुंबई | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी सुरु आहेत. नवीन मित्र जोडण्याचे काम सुरु आहेत. युती अन् आघाड्यांसाठी चर्चा होत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर महायुतीत मनसे येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेला दोन किंवा तीन जागा मिळण्याबाबत चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट अज्ञातस्थळी झाली. सुमारे ३० ते ४५ मिनिटे दोन्ही नेते एकत्र होते. यामुळे या प्रकारबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.
अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीवरुन मुंबईत येण्यासाठी निघाले. सुमारे बुधवारी रात्री ११.१५ वाजता देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्याचवेळी राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानावरुन बाहेर पडले. दोन्ही नेते मुंबई विमानतळ ते लोअर परले दरम्यान अज्ञात स्थळी भेटले. रात्री ११.३० ते १२.१५ दरम्यान अर्धा ते पाऊन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर १२.३० वाजता राज ठाकरे पुन्हा शिवतीर्थावर परतले. मध्यरात्री झालेल्या या बैठकीची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. परंतु यंदा गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे लोकसभेसाठी जोरदार तयारी करत आहेत. आता अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांनी पक्षातील लोकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत भाजपसोबत युती करण्याबाबत चर्चा होणार आहे. यामुळे महायुतीत मनसे येण्याचा निर्णय एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
मनसेला लोकसभेचा कोणत्या जागा मिळणार? याकडे मनसे सैनिकांचे लक्ष लागेल आहे. लोकसभेच्या १३ मतदार संघात मनसेचे अस्तित्व आहे. यामुळे महायुतीत मनसे आल्यानंतर या ठिकाणी फायदा होणार आहे. मनसेला मुंबई, शिर्डी किंवा नाशिकमधील एक लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे.