निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : राज्यातील विचित्र राजकीय परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. अशी परिस्थिती जगात फक्त केवळ महाराष्ट्रातच झाली असेल. या राज्यात अर्धा पक्ष सत्तेत आहे तर अर्धा पक्ष विरोधात आहे. अशी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती मी कधीच पाहिली नव्हती. जगातही कुठेच असं घडलं नसेल, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या वीर सावरकर सभागृहात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी हा हल्ला चढवला. राज्यात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती झाली आहे. असं राजकारण पाहिलं नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल. दोन पक्ष. त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा बाहेर आहे. विशेष म्हणजे त्याच नावाने. सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी आणि बाहेर राष्ट्रवादी. अशी परिस्थिती जगात पाहिली का? हे काय राज्य म्हणायचं की काय म्हणायचं? नुसतं आपलं चालू आहे. दिवस ढकलत आहेत, असा हल्ला राज ठाकरे यांनी चढवला.
अनेक विषय आहेत. टोलचा विषय. टोलनाक्यांवर 90 कॅमेरे लावण्यात आले आहेत. किती गाड्या येतात किती जातात समजतच नाही. रोजच्या किती गाड्यांची नोंदणी किती होते. रोज हजार हजार गाड्या जातात. टोलवर गाड्या तेवढ्याच. म्हटलं बघूया. आता रेकॉर्डच करून टाकायचं ठरवलं, असं राज ठाकरे म्हणाले.
काल कोकणात पूल पडला. मी मागेच म्हणालो होतो पूल आणि रस्त्यांचं ऑडिट झालं पाहिजे. पण कुणाचंच लक्ष नाहीये. तुम्ही जगा मरा काही पडलं नाही. मतदानाच्या दिवशी मतदान करा. तिथेच मेला तरी चालेल, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
कोरोडो रुपये वाया जात आहे. लोक मतदान करत आहेत. कोणता देश आहे कळत नाही. ज्या देशातील लोकांना राग येत नाही, तिथे काय करायचं? ज्यांच्या हातून ब्रिज पडत आहेत. रस्ते चांगले मिळत नाही. अशा लोकांना हजार हजार कोटींची कामे दिली जात आहे. आम्ही हताशपणे राहायचं. निवडणुका कधी लागणार हे सुद्धा विचारलं जात नाही. भीती नावाची गोष्ट राहिली नाही. कुणाला राग येत नाही. आतमध्ये ज्या गोष्टी धुमसतात ना त्या योग्य वेळी बाहेर काढेल. आपल्या इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले ना तर याद राखा, असा इशाराच राज यांनी दिला.
पुढच्या वर्षी येणाऱ्या मुंबई आणि कोकणातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा आजच्या बैठकीचा विषय आहे. भारत काय, इंडिया काय, हिंदुस्थान काय… जगातील एकमेव देश असेल तिथे अशा प्रकारची लोकशाही चालते. मला एकदा प्रमोद नवलकरांनी पदवीधर मतदारसंघाचा फॉर्म दाखवला होता. त्यावर लिहिलं होतं सही अथवा अंगठा. म्हणजे उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे असं नाही.
पण मतदार हा पदवीधर असलाच पाहिजे. याला म्हणतात लोकशाही. शिक्षक मतदारसंघात शिक्षक असलाच पाहिजे असं काही नाही. पण मतदार शिक्षक असलाच पाहिजे. याला म्हणतात लोकशाही. या लोकशाहितील ही निवडणूक आहे. त्यामुळे फॉर्म भरून घ्या. त्या काळात आपल्याला फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.