मुंबई : “शिवसैनिकांच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती”, असा मोठा गौप्यस्फोट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलाय. नारायण राणे (Narayan Rane) यांनी बंड केलं तेव्हा शिवसैनिकांची मालवणमध्ये जाण्याची हिंमत नव्हती, असंही संदीप देशपांडे म्हणाले. “मुंबईतल्या गुंडांना शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरेंची सुपारी दिली होती. मालवणमध्ये राज ठाकरेंच्या घातपाताचं षडयंत्र होतं. नारायण राणेंवर नाव येण्यासाठी मालवणमध्ये घातपाताचं षडयंत्र आखलं होतं.आपल्या पक्षातील प्रतिस्पर्धीचा काटा काढता येईल, अशाप्रकारचं नीच राजकारण झालं होतं”, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला.
“ज्यावेळी 1988 ला राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेना चालवत होते तेव्हा उद्धव ठाकरे हे फोटो काढत होते. जाहीरात एजन्सी चालवत होते. 1995 मध्ये राज ठाकरेंनी 80 सभा घेतल्या. तीन महिने राज ठाकरे सभा करत फिरत होते. ज्यावेळी 1995 मध्ये शिवसेना भाजपाची सत्ता आली त्यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली”, असा दावा संदीप देशपांडे यांनी केला.
“राज ठाकरेंचे नाव जेव्हा बाळासाहेबांच्या नंतरचा नेता म्हणून पुढे येत होते, तेव्हा 1995 ते 2000 पर्यंत त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायला सुरुवात झाली. 2000 साली उद्धव ठाकरेंची अस्वस्थता वाढायला लागली. 2002 मध्ये बाळासाहेबांच्या इच्छेखातर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे नाव कार्याध्यक्ष म्हणून घोषित केले”, असं संदीप देशपांडे म्हणाले.
“यानंतर राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांनी गळचेपी करण्यास सुरुवात केली. प्रवीण दरेकरांचे म्हाडाचे तिकीट जाहीर केले आणि दुसऱ्याच दिवशी कापले. नारायण राणेंनी बंड केले तेव्हा मालवणला एकाही शिवसैनिकांची जायची हिंमत नव्हती. तेव्हा राज ठाकरे 400 गाड्या घेवून तिकडे गेले. त्यावेळी एक अघडीत गोष्ट घडवण्याता कट आखण्यात आलेला”, असं संदीप देशपांडे म्हणाले.
“त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भावनिक आव्हानाला तुम्ही बळी पडू नका. काही दिवसांनी ते संजय राऊत घाटकोपरमध्ये दगड मारत फिरतील की शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली. “या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी फक्त कृष्णकुंजचे दरवाजे उघडे होते. उद्धव ठाकरे हे फक्त फेसबुक लाईव्हमधून बोलायचे. आता त्यांच्याकडे एकच अस्त्र उरलं आहे ते म्हणजे सहानुभूतीचे. ते भोळा चेहरा करुन तुमच्याकडे येतील”, असं देशपांडे म्हणाले.
“राज ठाकरेंनी बाळासाहेबांचा एक व्हिडीओ टाकला होता, ज्यात नाव गेले तर कधी येत नाही असे टाकले. तेव्हा एकाने फेसबुकवर लिहले होते की भावाने भावाच्या पाठीमागे उभं रहायला हवं होतं. जेव्हा आमचा अमित गंभीर आजाराने लढत होता तेव्हा हरामखोरांना भाऊ आठवला नाही”, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला.
“मी काही दिवसांपूर्वी संजय राऊतांना पत्र लिहीले त्यावर प्रतिक्रिया देताना भुवया उडवत होते. दाऊदला दम देणारा संजय राऊत राजा ठाकूरला घाबरतो. खोके देवून, पाच-पाच कोटी देवून आमचे नगरसेवक फोडले तेव्हा भाऊ नाही आठवला का? तुम्ही पाच खोके देवून आमचे फोडले तर पन्नास खोके देवून तुमचे फोडले तर कसला अन्याय? न्याय प्रत्येकासाठी सारखाच असतो”, असं संदीप देशपांडे म्हणाले.