मुंबई : शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेची खिल्ली उडवली जात असताना, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना विरुद्ध मनसे वाद पेटण्याची चिन्ह आहेत.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
“शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही, तो न्यायालयात सुद्धा टिकेल, असं मला मूळचा शिवसैनिक असलेला वकील सांगत होता.” असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
शिवसेन-भाजप युतीची घोषणा झाल्याच्या काही तासांनंतरही संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले होते. त्या ट्वीटचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली होती. “अफझल खानाच्या साक्षीने प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने शरयू आणि चंद्रभागेच्या स्नाना मुळे युती मीठी नदीकाठी पवित्र झाली आता पहिले सरकार फिर मंदिर जय श्रीराम #लाचारसेना” असा ट्वीट संदीप देशपांडे यांनी केला होता.
शिवसेना-भाजपकडून युतीची घोषणा
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर काल (18 फेब्रुवारी) घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.